
Baramati and Rahuri : नगर : राज्यातील राहुरी आणि बारामती (Baramati and Rahuri) विधानसभा मतदारसंघात (ता.२३) एप्रिलला पोटनिवडणूक होणार आहे. राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile) यांचे निधन झाले. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री व बारामती विधानसभा मतदारसंघाचे आमदार अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर या दोन्ही मतदारसंघातील जागा रिक्त होती. सद्यस्थितीला भाजपकडून राहुरी मतदारसंघासाठी दिवंगत शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले हे प्रमुख दावेदार मानले जातात. तर बारामती मतदारसंघासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार याच उमेदवार असण्याची अधिक शक्यता आहे. राहुरी आणि बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘रुद्र रिसर्च अँड एनालिटिक्स’ या संस्थेने थेट ग्राउंडवर जाऊन निवडणुकीचा आढावा घेतला आहे.
नक्की वाचा : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी नियुक्त अधिकाऱ्यांनी समन्वयाने जबाबदारी पार पाडावी : जिल्हाधिकारी
मतदारांमध्ये सहानुभूती
बारामती विधानसभा मतदारसंघात संपूर्ण बारामती तालुक्यासह ७ जिल्हा परिषद गट, बारामती आणि मालेगाव बु. या २ नगरपालिकांचा समावेश होतो. तसेच एकूण १६१ गावे आणि ३८६ बूथचा समावेश होतो. बारामती मतदारसंघामध्ये एकूण ३ लाख ८३ हजार ७६७ मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या १ लाख ९३ हजार ४९६ तर महिला मतदारांची संख्या १ लाख ९० हजार २७१ इतकी आहे. बारामती विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या उमेदवार असण्याची अधिक शक्यता आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती मतदारसंघात असलेले कार्य, जनसंपर्क, त्यांना मानणारा मतदार, कामाबद्दल असलेली तत्परता आणि स्पष्टोक्तेपणा यामुळे नागरिकांमध्ये ते लोकप्रिय होते. त्यांच्या निधनानंतर मतदारांमध्ये सहानुभूती निर्माण झाल्याचे दिसून येते.
अवश्य वाचा : अहिल्यानगर महापालिकेत स्थायी समितीकडून तब्बल १७१० कोटीचे अंदाजपत्रक मंजूर
धनगर समाजाचा निवडणुकीवर मोठा प्रभाव (Baramati and Rahuri)
यामुळे आगामी पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांची विधानसभा सदस्य म्हणून बिनविरोध निवड होण्याची शक्यता दिसून येते. मात्र, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ओबीसींचे प्रश्न सोडवण्यासाठी निवडणूक हे माध्यम आहे. बारामती मतदारसंघाची निवडणूक लढवायची की नाही हे कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून ठरवणार असल्याचे सांगितले. यामुळे निवडणूक बिनविरोध होईल का नाही याबद्दल संभ्रम दिसून येतो. तसेच ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती’ या रुग्णालयाचे नाव बदलून स्व. अजित पवार यांचे नाव देण्याची झालेली प्रक्रीया यामुळे बारामती मतदारसंघामध्ये महत्त्वाचा फॅक्टर असलेला धनगर समाज नाराज दिसून आला. बारामती मतदारसंघात अंदाजे २८% धनगर मतदार आहे. या समाजाचा निवडणुकीवर मोठा प्रभाव असल्याचे दिसून येते.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
राहुरी विधानसभा मतदारसंघ ३ तालुक्यांमध्ये विभागला
बारामती मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याने व पक्षाकडून विरोधात उमेदवार देण्यात येणार नसल्याची बाब आणि अजित पवार यांच्याबद्दल मतदारांमध्ये निर्माण झालेल्या सहानुभूतीमुळे सुनेत्रा पवार यांचा आगामी निवडणुकीत विजय होण्याची अधिक शक्यता असल्याचे ग्राउंडवर मतदारांसोबत केलेल्या संवादातून दिसून आले. राहुरी विधानसभा मतदारसंघ ३ तालुक्यांमध्ये विभागला गेला आहे. राहुरी तालुक्यातील १ लाख ९३ हजार ६८३ (५८%) मतदार, अहिल्यानगर तालुक्यातील ८२ हजार २४० मतदार (२५%) मतदार आणि पाथर्डी तालुक्यातील ५७ हजार २९ मतदारांचा (१७%) राहुरी विधानसभा मतदारसंघात समाविष्ट आहेत. एकूण ७ जिल्हा परिषद गटांचा पूर्णपणे समावेश होतो. तसेच राहुरी नगरपालिकेचा समावेश होतो.
१३८ गावांचा समावेश
याशिवाय दरेवाडी नवनागापूर आणि नागरदेवळे या जिल्हा परिषद गटातील काही गावांचा या मतदारसंघात समावेश होतो. या मतदारसंघात एकूण १३८ गावांचा समावेश होत असून एकूण ३७४ बूथ आहेत. राहुरी मतदारसंघातील एकूण मतदान ३ लाख ३२ हजार ९५२ इतके आहे. यामध्ये पुरुष मतदार १ लाख ७१ हजार ९८८ इतके तर महिला मतदार ११ लाख ६० हजार ९६४ इतके आहेत. एप्रिल महिन्यामध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले, तसेच भाजपकडून सुजय विखे पाटील यांच्या नावाची देखील नागरिकांमध्ये चर्चा दिसून आली.
अक्षय कर्डिले यांच्या पाठीशी शिवाजी कर्डिले यांची सहानुभूती
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून प्राजक्त तनपुरे यांच्या नावाची चर्चा दिसून येते. मात्र, अलीकडच्या काळामध्ये माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी घेतलेली हिंदुत्ववादी भूमिका, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केलेली स्तुती त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाची देखील चर्चा नागरिकांमध्ये होत असल्याची दिसून येते. तसेच भाजपचे नेते सुजय विखे पाटील यांनी उमेदवारीसाठी इच्छूक नसल्याचे स्पष्ट केले असले तरी मतदारांमध्ये मात्र त्यांच्या उमेदवारीबाबत चर्चा होत आहे. भाजपचे युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या पाठीशी शिवाजी कर्डिले यांची सहानुभूती असल्याचे दिसून येते.
अटीतटीची लढत होण्याची शक्यता
मतदारसंघात शिवाजी कर्डिले यांचे चिरंजीव आणि युवा चेहरा अशी अक्षय कर्डिले (वय ३०) यांची ओळख असली तरी प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या तुलनेत मर्यादित जनसंपर्क आणि मर्यादित राजकीय अनुभव यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी आव्हानात्मक असल्याचे दिसून येते. जर भाजपचे संभाव्य उमेदवार अक्षय कर्डिलें विरुद्ध महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्यात लढत झाल्यास, सहानुभूतीचा मुद्दा आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांचा भाजपचे संभाव्य उमेदवार अक्षय कर्डिले यांना पाठिंबा मिळाल्यास अक्षय कर्डिले यांच्या विजयाची शक्यता नाकारता येत नही. मात्र, राजकीय अनुभवाच्या मुद्द्यावर निवडणूक झाल्यास अक्षय कर्डिले विरुद्ध प्राजक्त तनपुरे यांच्यात अटीतटीची लढत होण्याची शक्यता दिसून येते.
अक्षय कर्डिले यांची प्रतिस्पर्धी प्राजक्त तनपुरे यांच्या राजकीय अनुभवासोबत तुलना
तसेच प्राजक्त तनपुरे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवली तर महाविकास आघाडीकडे सक्षम उमेदवाराचा अभाव असल्याचे दिसून येते. त्यामुळे प्राजक्त तनपुरे यांचा एकतर्फी किंवा बिनविरोध विजय होण्याची शक्यता आहे. दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरी मतदारसंघातील नागरिकांमध्ये सहानुभूती असल्याचे दिसून आले. आगामी पोटनिवडणुकीत सहानुभूतीचा मुद्दा महत्वाचा ठरणार असल्याचे दिसून येते. तसेच शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांची प्रतिस्पर्धी संभाव्य उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्या राजकीय अनुभवासोबत तुलना होत असल्याने हा देखील मुद्दा महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे.
सुनेत्रा पवार यांचा एकतर्फी विजय होण्याची शक्यता
राहुरी विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना त्यांच्या उसाला व दुधाला अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात नाराजी दिसून आली, याशिवाय, साखर कारखान्यांकडून उसाची बिले वेळेत मिळत नसल्यामुळे शेतकरी त्रस्त असल्याचे दिसून आले. अहिल्यानगर-मनमाड महामार्गाचे काम गेल्या अनेक दिवसांपासून संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झालेले अपघात, वाहतूक कोंडी, धूळ यामुळे नागरिक त्रस्त दिसून आले. बारामती विधानसभा निवडणूक बिनविरोध होणार की नाही ही बाब आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या भूमिकेवर अवलंबून असणार आहे. मात्र, निवडणूक झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा एकतर्फी विजय होण्याची शक्यता अधिक दिसून येते.
राहुरी विधानसभा निवडणुक बिनविरोध होण्याची शक्यता कमी
तर राहुरी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून अक्षय कर्डिले, सुजय विखे पाटील आणि महाविकास आघाडीकडून प्राजक्त तनपुरे यांच्या नावाची चर्चा असल्याने निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी असून भाजप विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये अटीतटीची लढत होण्याची शक्यता दिसून येते. मात्र, कर्डिले यांच्याबद्दलची सहानुभूती, सत्तेतील पक्ष असल्याचा फायदा, सुजय विखे पाटील यांची ताकद, प्राजक्त तनपुरेंची पक्षाविषयी असलेली संभ्रमाची भूमिका यामुळे राहुरी मतदारसंघात आजच्या घडीला भाजपचे पारडे जड असल्याचे दिसून येते.


