Fraud:श्रीगोंदा: सर्वसामान्यांनी आपल्या पाल्यांच्या उज्वल भविष्यासाठी साठवलेला कष्टाचा पैसा हडपणाऱ्या कंपन्यांचे पेव श्रीगोंदा तालुक्यात थांबण्याचे नाव घेईना. ‘सिस्पे’, ‘समर्थ क्रॉप’ आणि ‘साईसेवा’ सारख्या घोटाळ्यांच्या (Fraud) जखमा अजून ताज्या असतानाच, आता ‘नेक्स्ट जन होमबास्क एलएलपी’ या कंपनीने ‘यु-निड्स’ आणि गोल्ड इन्व्हेस्टमेंट या गोंडस नावाखाली शेकडो गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा चुना लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या कंपनीने गुंतवणूकदारांना (investors) आकर्षित करण्यासाठी सुरुवातीला दरमहा १० टक्के परतावा देण्याचे प्रलोभन दाखवले होते. वाढीव परताव्याच्या आमिषाला बळी पडून तालुक्यातील अनेक नागरिकांनी आपली आयुष्यभराची पुंजी या कंपनीत गुंतवली. सुरुवातीला काही महिने नियमित परतावा देऊन विश्वास संपादन करण्यात आला. मात्र, हळूहळू हा परतावा १० टक्क्यांवरून थेट ३ टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून तर हा परतावादेखील बंद झाल्याने गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले आहेत.
अवश्य वाचा- पाणी आरक्षण व आवर्तनावरून निळवंडे कृती समिती आक्रमक; अधिकाऱ्यांना निवेदन
श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दोन संशयितांविरुद्ध तक्रार अर्ज (Fraud)
‘यु-निड्स’ (तुमच्या गरजा) असे ब्रीदवाक्य मिरवणारी ही कंपनी प्रत्यक्षात ‘आय-निड्स’ (माझ्या गरजा) प्रमाणे वागली. गुंतवणूकदारांचे पैसे घेऊन स्वतःच्या गरजा पूर्ण केल्यानंतर आता कंपनीचे संचालक पसार झाल्याचे चित्र आहे. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दोन संशयितांविरुद्ध फसवणुकीचे तक्रार अर्ज प्राप्त झाले आहेत. ‘युनिड्स आणि गोल्ड’ यांसारख्या विविध योजनांच्या नावाखाली हा सावळागोंधळ नेमका कसा सुरू होता, याचा तपास आता पोलीस करत आहेत. घोटाळ्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच श्रीगोंदा तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. कष्टाचे पैसे बुडाल्याच्या भीतीने शेकडो गुंतवणूकदारांची झोप उडाली असून, अनेकांनी पोलीस ठाण्याकडे धाव घेतली आहे. या प्रकरणात लवकरच अधिकृत गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
“नेक्स्ट जन होमबास्क कंपनीने आर्थिक फसवणूक केल्याबाबत दीपक गोरे व निखिल बोरुडे यांच्या नावे तक्रार अर्ज प्राप्त झाले आहेत. नागरिकांनी कोणत्याही अनधिकृत किंवा अवाजवी परतावा देणाऱ्या योजनांना बळी पडू नये. कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा.”
— किरण शिंदे, पोलीस निरीक्षक, श्रीगोंदा.
Table of Contents
–



