Kolgaon News : नगर : गुढीपाडवा निमित्त ग्रामपंचायत कोळगावतर्फे ‘ज्ञानाची गुढी प्रगतीची दिशा’ हा अभिनव उपक्रम उत्साहात पार पडला. ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित या उपक्रमात पुस्तकांची (Books) आकर्षक गुढी उभारून वाचन (Reading) संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. चरित्रग्रंथ, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, धार्मिक, पर्यावरणविषयक तसेच वैज्ञानिक विषयांवरील विविध पुस्तकांचा समावेश करण्यात आला होता. या उपक्रमाच्या माध्यमातून ‘एक गाव एक वाचन संस्कृती’ हा संदेश (Message) ग्रामस्थांपर्यंत पोहोचविण्यात आला.
हेही वाचा : श्रीगोंद्यात गुंतवणुकीच्या नावाखाली कोट्यवधींचा गंडा; शेकडो गुंतवणूकदारांची उडाली झोप
कोळगाव ग्रामपंचायतीचे अभिनव उपक्रम
कोळगाव ग्रामपंचायत विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे चर्चेत आहे. महिला दिनानिमित्त आई-बहिणींवरून शिवीगाळ करणाऱ्याऱ्यांवर दंड आकारण्याचा ठराव करण्यात आला आहे. तसेच स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणा-यांवर १०० रुपयांचा दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची सवय रुजवण्यासाठी ग्रामपंचायतीने संध्याकाळी ७ ते ९ या वेळेत मोबाईल व टेलिव्हिजन वापर टाळण्याचा नियम लागू केला असून ग्रामस्थ त्याचे पालन करत आहेत. या उपक्रमांमुळे गावात सकारात्मक बदल होत असल्याचे दिसून येत आहे.
नक्की पहा : नगर-दौंड महामार्गावर पुन्हा अपघात; पाच जण गंभीर जखमी
यांची उपस्थिती (Kolgaon)
कोळगाव ग्रामपंचायत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत गावात वाचनालय उभारून वाचन संस्कृती वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहे. सरपंच पुरुषोत्तम लगड, उपसरपंच विलास शितोळे, ग्रामविकास अधिकारी शरद कवडे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पनवेल महानगरपालिकेत जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत असलेले कोळगावचे रहिवासी नितीन साके यांच्या सौजन्याने हा उपक्रम राबविण्यात आला. त्यांनी ग्रामपंचायत वाचनालयासाठी ५० पुस्तकांचे दान दिले. यावेळी देवराम साके, रत्नमाला साके, डॉ. निकिता साके आदी उपस्थित होते.



