Fraud : नगर : सध्या जगावर युद्धाचे (War) सावट आहे. त्यामुळे शेअर मार्केट (Share Trading) कोसळत आहे. शेअर मार्केटमधून मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवत चक्क एका महिलेने शिक्षकाची थोडी थिडकी नव्हे तर चक्क एक कोटी ३१ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक (Fraud) केल्याची बाब समोर आली आहे.
नक्की वाचा : ‘बैटल ऑफ गलवान’चा नवा अवतार; सलमान खानचा चित्रपट आता ‘मातृभूमी’ नावाने येणार
गुन्हा दाखल
अहिल्यानगर शहरातील बालिकाश्रम रस्ता परिसरात राहणाऱ्या ५६ वर्षीय शिक्षकाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी महिलेविरूध्द शनिवारी (ता. २१) मार्च सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी शिक्षक हे एका विद्यालयात उपमुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, (ता. २५) नोव्हेंबर २०२५ ला त्यांना व्हॉट्सअॅपवर शेअर ट्रेडिंगबाबत जाहिरात दिसली. अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत संबंधितांनी त्यांना एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. या ग्रुपमधील अॅडमिन महिलेने गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळवून देण्याचे आश्वासन देत फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांचा विश्वास संपादन केला.
अवश्य वाचा : अहिल्यानगरचा संकल्प थोरात यंग ऑलिम्पिकचा ॲम्बेसेडर; करणार भारताचे प्रतिनिधित्व
मोठ्या रकमा ट्रान्सफर (Fraud)
तिच्या सांगण्यावरून फिर्यादी, त्यांची पत्नी, मुलगा, मुलगी तसेच बहिणीच्या बँक खात्यांतून विविध बँक खात्यांमध्ये वेळोवेळी मोठ्या रकमा ट्रान्सफर करण्यात आल्या. २७ नोव्हेंबर २०२५ ते १ जानेवारी २०२६ या कालावधीत फिर्यादी यांनी स्वतःच्या खात्यातून सुमारे ७७ लाख ४५ हजार रुपये, मुलाच्या खात्यातून ८ लाख ९० हजार रुपये, मुलीच्या खात्यातून १ लाख ३० हजार रुपये, पत्नीच्या खात्यातून ३० लाख रुपये तसेच बहिणीच्या खात्यातून १४ लाख रुपये अशी एकूण १ कोटी ३१ लाख ६५ हजार रूपयांची रक्कम विविध बँक खात्यांमध्ये जमा केली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
आणखी पैसे भरण्याची मागणी
दरम्यान, गुंतवणुकीवर परतावा मिळण्याची वेळ आल्यानंतर आरोपी महिलेने आणखी पैसे भरण्याची मागणी केली. यानंतर संशय आल्याने फिर्यादीने संबंधिताशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कुठलाही संपर्क झाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी नॅशनल सायबर क्राईम पोर्टलवर (हेल्पलाईन १९३०) तक्रार नोंदवली तसेच येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने विविध बँक खात्यांचा वापर करून रक्कम वळवली असल्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा पोलीस निरीक्षक सागर ढिकले अधिक तपास करीत आहेत.
गुंतवणुकीच्या ऑफर्सवर विश्वास ठेवू नका
अनोळखी व्यक्तींच्या गुंतवणुकीच्या ऑफर्सवर विश्वास ठेवू नका, अधिक नफ्याचे आमिष दाखवणाऱ्या जाहिरातींपासून सावध राहा, कोणतीही रक्कम ट्रान्सफर करण्यापूर्वी खात्री करा, संशयास्पद व्यवहार आढळल्यास त्वरित १९३० वर संपर्क साधा, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.



