नगर : “चार वर्षे आणि अडीच हजार मृत्यू”! हा फक्त आकडा नाही, तर प्रशासनाच्या डोळ्यादेखत विझलेले अडीच हजार दिवे आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या चार वर्षात अडीच हजारांहून (2,500 Child Deaths) अधिक बालकांचा मृत्यू (Ahilyanagar Child Deaths) झाल्याचे समोर आले आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील ० ते ५ वयोगटातील बालमृत्यूचे प्रमाण अजूनही चिंताजनकच आहे. मागील काही वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकली असता बालमृत्यूची संख्या सातत्याने मोठी असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या मार्गदर्शनात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांच्या सुचनांनुसार, आरोग्य विभागाकडून मातृ-बाल आरोग्य योजना, लसीकरण मोहिमा, पोषण आहार कार्यक्रम राबवले जात असतानाही बालमृत्यूचे प्रमाण अपेक्षेप्रमाणे कमी होत नसल्याचे या आकडेवारीवरून दिसून आलं आहे.
नक्की वाचा: भोंदूबाबा अशोक खरातचे शिर्डी, नगरमध्ये मालमत्तांचे जाळे
बालमृत्यूचे कारण काय ? (Ahilyanagar Child Deaths)
ग्रामीण भागात होणार कुपोषण, वेळेवर उपचार न मिळणे, प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतरची योग्य काळजी न घेणे, तसेच काही ठिकाणी आरोग्य सुविधांची असलेली कमतरता, ही यामागील प्रमुख कारणे मानली जात आहेत. २०२२-२३ मध्ये जिल्ह्यातील बालमृत्यूची संख्या ६२७ इतकी होती. विशेष म्हणजे २०२३-२४ मध्ये बालमृत्त्यूची संख्या सर्वाधिक ६७९ इतकी होती. त्यानंतर २०२४-२५ मध्ये यात किंचित घट झाली असली तरी ती अजूनही चिंताजनक पातळीवर आहे. चालू वर्षातील आकडे पाहता वर्षाअखेर हा आकडा पुन्हा ६०० पेक्षा जास्त होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आपण जर पाहिलं तर महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून गरोदर महिलांच्या आहारावर दरवर्षी कोट्यवधींचा खर्च केला जातो. विशेषतः आदिवासी पट्ट्यात पोषण आहार, अतिरीक्त पोषण आहारासाठी योजना राबवल्या जातात. मात्र, त्याचे फलित काय ? माता मृत्यू, बालमृत्यू, कुपोषण सद्यस्थिती काय, लाभार्थी यादी काय सांगते, पोषण आहार कुठे, कसा दिला जातो, याचा सीईओ कधीतरी ग्राऊंडवर आढावा घेणार का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अवश्य वाचा: श्रीगोंद्यात ट्रॉलीमध्ये बिबट्या अन् तरुणाचा एकत्र मुक्काम;नेमकं घडलं काय?
बालमृत्यूचे प्रमाण कमी होणार का ? (Ahilyanagar Child Deaths)
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, गर्भवती मातांची नियमित तपासणी, नवजात बालकांची विशेष काळजी, कुपोषणावर प्रभावी उपाययोजना आणि ग्रामीण आरोग्य व्यवस्थेची मजबुती या बाबींवर अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. अन्यथा बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्याचे उद्दिष्ट गाठणे कठीण होईल. बालमृत्यू रोखण्यासाठी प्रशासनाने अधिक प्रभावी उपाययोजना करणे गरजेचे असल्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक बालकाचे आरोग्य सुरक्षित ठेवणे ही यंत्रणेसमोरील मोठी जबाबदारी ठरत आहे. मात्र अहिल्यानगर जिल्ह्यातील आजची ही परिस्थिती पाहता उद्या हा आकडा वाढला तर सरकार यावर काय तोडगा काढणार, हे पहावे लागेल.



