Fox terror:श्रीगोंदा: तालुक्यातील आढळगाव परिसरात सध्या कोल्ह्याच्या दहशतीने (Fox terror) नागरिक भयभीत झाले आहेत. नगरगाव रस्ता परिसरात गुरुवारी (ता.२६) सकाळी एका पिसाळलेल्या कोल्ह्याने धुमाकूळ घालत तिघांवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात एका महिलेसह तिघे गंभीर जखमी (seriously injured) झाले असून,परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. गुरुवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास ग्रामस्थ कामासाठी घराबाहेर पडत असताना ही घटना घडली.
अवश्य वाचा- संगमनेरमध्ये रामजन्मोत्सव भक्तिमय वातावरणात
झडप घालून पायाचा लचका तोडला (Fox terror)
बाळासाहेब भुरे सकाळी घराबाहेर असताना कोल्ह्याने अचानक त्यांच्यावर झडप घालून पायाचा लचका तोडला. भुरे यांच्यानंतर कोल्ह्याने अरुण काळे यांच्यावर हल्ला केला. जखमी झालेले असूनही काळे यांनी धाडसाने कोल्ह्याला पकडून ठेवले होते, मात्र चेहऱ्याला गंभीर जखम होऊन रक्तस्राव वाढल्याने अखेर त्यांना कोल्ह्याला सोडावे लागले. यानंतर कोल्ह्याने आपला मोर्चा राहीबाई बोळगे यांच्याकडे वळवून त्यांनाही चावा घेतला आणि तेथून पळ काढला. रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास कोकणगाव येथील संजय नेर्लेकर यांच्यावर हल्ला करत चावा घेतल्याने ते गंभीर जखमी झाले.
नक्की वाचा- धर्मांतर केल्यास अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन शोधमोहीम राबवली (Fox terror)
जखमींना तातडीने आढळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, मात्र जखमांचे गांभीर्य पाहून त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच भाजपा युवा कार्यकर्ते गणेश काळे यांनी वनविभागाला पाचारण केले. वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन शोधमोहीम राबवली, परंतु कोल्हा हाती लागला नाही. कोल्हा हा मुळात भित्रा प्राणी समजला जातो, मात्र आढळगावात अशा हल्ल्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी नोव्हेंबर महिन्यातही कोल्ह्याने दोघांना जखमी केले होते. वारंवार होणाऱ्या या हल्ल्यांमुळे शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये आणि मजुरांमध्ये घबराट आहे. वनविभागाने तातडीने पिंजरा लावून या नरभक्षक कोल्ह्याला जेरबंद करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.



