Mohatadevi:पाथर्डी: मोहटादेवी गड येथील वासंतिक नवरात्र महोत्सवाची सांगता अत्यंत भक्तिमय वातावरणात होमहवन व कुमारिका पूजनाने करण्यात आली. देवस्थानचे विश्वस्त शशिकांत दहिफळे, शुभम दहिफळे व अॅड. ऋतीका कराळे यांच्या हस्ते विधिवत होमहवन पार पडले. यानिमित्त राज्यातून आलेल्या देवी भक्तांनी मोहटादेवीच्या (Mohatadevi) दर्शनाचा लाभ घेतला. या नवरात्र महोत्सवाच्या काळात देवस्थान समितीकडून विशेष उपाययोजना करण्यात आल्या होत्या. वासंतिक (चैत्र) नवरात्र हे देवीची उपासना करून आत्मशुद्धी, नवचैतन्य आणि सकारात्मक संकल्पांची सुरुवात करण्याचा पवित्र काळ मानला जातो. या नवरात्रात भक्त देवीची आराधना करून आरोग्य, सुख-समृद्धी आणि यशाची प्रार्थना (Prayer) करतात. वसंत ऋतूतील नव्या उर्जेचे आणि जीवनातील नव्या प्रारंभाचे हे प्रतीक आहे.देवीच्या वासंतिक नवरात्रोत्सवादरम्यान शांतीपाठ, महासंकल्प, पुण्याहवाचन, चंडी याग हवन, चौसष्ट योगिनी, दशमहाविद्या, अष्टभैरव यांसह विविध देवतांचे पूजन, अभिषेक व षोडशोपचार विधी मोहटादेवी गडावर करण्यात आले. तसेच कुमारिका पूजनाने सोहळ्याला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले.
अवश्य वाचा- मढीत शिव पाणंदचे राज्यस्तरीय अधिवेशन; ट्रस्टींकडून सहकार्याचे आश्वासन
हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र पर्व (Mohatadevi)
नवरात्रोत्सवाची सांगता असल्याने पहाटेपासूनच भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. चैत्र नवरात्र म्हणून ओळखला जाणारा हा उत्सव हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र पर्व मानला जातो. आत्मशुद्धी, सकारात्मक संकल्प व आध्यात्मिक उन्नतीचे प्रतीक म्हणून या उत्सवाकडे पाहिले जाते. यावेळी सर्व भक्तांच्या आरोग्य, सुख-समृद्धी व धनधान्य वृद्धीसाठी महासंकल्प करून प्रार्थना करण्यात आली. देवस्थानचे विश्वस्त अॅड. विक्रम वाडेकर, श्रीकांत लाहोटी, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे, लता दहिफळे, योगिता दहिफळे, कावेरी लाहोटी, पूजा वाडेकर, संतोष शर्मा, प्रसाद कुलट, जनसंपर्क अधिकारी भिमराव खाडे आदी उपस्थित होते. पौरोहित्य नारायण देवा सुलाखे, भुषणदेवा, निखील सुलाखे यांच्यासह महेश झेंड, विशाल किडे, शुभम जोशी, सिद्धेश्वर रामदासी, विशाल सुलाखे, भगवान जोशी यांनी केले. दरम्यान, पिंपरी चिंचवड (किवळे) येथील उद्योजक व देवीभक्त चंद्रशेखर कातळे व नगरसेविका रेश्मा बापूजी कातळे परिवाराच्या वतीने मोहटे येथील रेणुका विद्यालयातील विद्यार्थिनींना वस्त्रदान, कुमारिका पूजन व अन्नदान करण्यात आले.



