
‘Raja Shivaji’ Teaser : नगर : जिओ स्टुडिओज (Jio Studios) आणि मुंबई फिल्म कंपनी निर्मित ‘राजा शिवाजी’ (‘Raja Shivaji’ Teaser) या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ‘फर्स्ट लूक टीझर’ अखेर डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. नुकताच ‘धुरंधर: द रिव्हेंज’ (Dhurandhar: The Revenge) या चित्रपटासोबत चित्रपटगृहांमध्ये विशेषरीत्या प्रदर्शित करण्यात आलेल्या या टीझरला थिएटरमध्ये टाळ्या आणि जल्लोषाचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. सोशल मीडियावरही प्रेक्षकांनी टीझर बद्दल प्रतिक्रिया दिल्या होत्या. आता हाच टीझर डिजिटल माध्यमातून प्रदर्शित होतो आहे, भारताच्या सर्वश्रेष्ठ महान अश्या राजाची भव्य झलक अधिक व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असून, चित्रपटाबाबतची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

नक्की वाचा : शिर्डी जमीन व्यवहारात फसवणूक; खरात पती-पत्नीसह पाच जणांवर गुन्हा दाखल
आधुनिक सिनेमॅटिक भव्यतेची जोड
‘राजा शिवाजी’ हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असून त्यांच्या पराक्रम, स्वाभिमान आणि स्वराज्य स्थापनेच्या प्रेरणादायी प्रवासाचे भव्य चित्रण यात करण्यात आले आहे. अभिनेता रितेश विलासराव देशमुख यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून मुख्य भूमिका देखील साकारली आहे. त्यांच्या दिग्दर्शनातून ऐतिहासिक विषयाला आधुनिक सिनेमॅटिक भव्यतेची जोड देण्याचा प्रयत्न स्पष्टपणे दिसून येतो.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
चित्रपटात दिग्गज कलाकारांची फळी (‘Raja Shivaji’ Teaser)
या चित्रपटाची एक मोठी जमेची बाजू म्हणजे त्याची दमदार स्टारकास्ट. संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बमन ईरानी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद जोशी,अमोल गुप्ते, जिनिलीया देशमुख , आणि रितेश विलासराव देशमुख यांसारख्या दिग्गज कलाकारांची फळी या चित्रपटात एकत्र आली आहे.
अजय-अतुल यांनी दिलेले दर्जेदार संगीत (‘Raja Shivaji’ Teaser)
यात थरारक ॲक्शन दृश्ये, वेधक आणि भावनिक नाट्य, दमदार संवाद आणि अंगावर रोमांच उभे करणारे संगीत यामुळे हा चित्रपट केवळ एक ऐतिहासिक कथा न राहता एक भव्य सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे. सुप्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी दिलेले दर्जेदार संगीत, तर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार संतोष सिवन यांची सिनेमॅटोग्राफी असल्यामुळे ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट मराठीतील आतापर्यंतचा सर्वात मोठा चित्रपट तर आहेच याशिवाय भारताच्या ऐतिहासिक वारस्याला जागतिक स्तरावर सादर करण्याची क्षमता ठेवतो.
चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या या टीझरला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद हा या चित्रपटाबद्दलच्या प्रेक्षकांच्या अपेक्षांचा ठोस पुरावा आहे. खचाखच भरलेल्या थिएटर्समध्ये उमटलेल्या टाळ्या, शिट्ट्या आणि जल्लोष यावरून ‘राजा शिवाजी’च्या ऐतिहासिक विश्वात रममाण होण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत, हे स्पष्ट होते. आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्यानंतर हा टीझर आणखी मोठ्या प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचत असून, या भव्य चित्रपटाच्या यशस्वी प्रवासाची दमदार सुरुवात ठरत आहे.

‘राजा शिवाजी’ हा चित्रपट एका प्रेरणादायी कथा असून हा चित्रपट भाषेच्या सीमा ओलांडत जागतिक स्तरावर सादर करण्याचे निर्मात्यांचे उद्दिष्ट आहे.
जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि मुंबई फिल्म कंपनी या बॅनरखाली ज्योती देशपांडे व जिनिलीया देशमुख यांनी निर्मिती केली आहे. ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट १ मे २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये मराठी, हिंदी आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. शौर्य, स्वाभिमान आणि स्वराज्याच्या उदयाला समर्पित असलेला हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक भव्य, प्रेरणादायी आणि अविस्मरणीय सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे.


