Gas Pipeline : नगर : आखाती देशांत युद्ध सुरू आहे. त्यामुळे भारतात घरगुती गॅसची टंचाई निर्माण झाली आहे. हे युद्ध थांबण्याचे चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे केंद्र सरकारने (Central Government) एक आदेश काढत गॅस पाईपलाईनद्वारे (Gas Pipeline) नागरिकांना गॅस पुरविण्याचे आदेश महापालिकांना दिले आहेत. मात्र, अहिल्यानगर महापालिकेतील (Ahilyanagar Municipal Corporation) नगरसेवकांनी या कामाला विरोध दर्शवला आहे.
नक्की वाचा : शिर्डी जमीन व्यवहारात फसवणूक; खरात पती-पत्नीसह पाच जणांवर गुन्हा दाखल
१२० किलोमीटर गॅस पाईपलाईन टाकण्यात येणार
अहिल्यानगर शहरात गॅस पाईपलाईन व्हावी यासाठी केंद्र सरकारच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी महापालिका आयुक्तांना निर्देश दिले आहेत. महापालिका आयुक्तांनी बीपीसीएल कंपनीचे अधिकारी व नगरसेवकांची एक बैठक काल (ता. १) महापालिकेत घेतली. या बैठकीत कंपनीने माहिती दिली की १२० किलोमीटर गॅस पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. एमआयडीसीत मुख्य प्रकल्प आहे. त्यातून मुख्य पाईपलाईन पत्रकार चौक मार्गे जिल्हा पोलीस अधीक्षक चौकात येईल. तेथून एक मुख्य पाईपलाईन शेंडी बाह्यवळण रस्त्यापर्यंत जाईल. तर दुसरी मुख्य पाईपलाईन केडगाव मार्गे पुणे महामार्गापर्यंत जाणार आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
महापालिकेकडे रिकामा भूखंड मागितला (Gas Pipeline)
या मुख्य पाईपलाईन मधून इतर पाईपलाईनद्वारे घरोघर गॅस पुरविला जाणार आहे. त्यासाठी गॅस कंपनीने रस्ते खोदण्याची व टाक्या उभ्या करण्यासाठी रिकाम्या भूखंडाची मागणी केली आहे. मात्र, या मागणीला महापालिकेने मान्यता दिलेली नाही. कंपनीने प्रभाग आठ वगळता सर्व प्रभागांमध्ये प्रत्येकी सहा बाय पाच मीटरचा रिकामा भूखंड महापालिकेकडे मागितला आहे. ही जागा कंपनीला कमीतकमी २५ वर्षांच्या कराराने हवी आहे.
गॅस पाईपलाईन सुरू करण्याचे आदेश
या प्रकल्पानुसार शहरात १२० किलोमीटरची पाईपलाईन टाकली जाणार आहे. त्यासाठी रस्ते खोदण्याची परवानगी गॅस कंपनीने मागितली आहे. त्यामुळे नगरसेवकांनी गॅस पाईपलाईनला विरोध दर्शवला आहे. २०१९मध्ये अहिल्यानगर शहरातील चार प्रभागांमध्ये गॅस पाईपलाईनसाठी गॅस कंपन्यांना महापालिकेकडून परवानगी मिळाली होती. मात्र, सहा वर्षे उलटूनही गॅस पाईपलाईन झालेली नाही. या प्रभागांत तातडीने गॅस पाईपलाईन सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. यातच आता पुन्हा गॅस कंपन्यांनी महापालिकेला परवानगी मागितली आहे. अहिल्यानगर शहरातील रस्त्यांची स्थिती नुकतीच सुधारलेली असताना पुन्हा रस्त्याची दुर्दशा होण्याची चिन्हे असल्याने नगरसेवकांकडून विरोध सुरू झाला आहे.



