Nature: निसर्गाशी मैत्री करा आणि आनंदी रहा: पद्मश्री राहीबाई पोपेरे

महिला पालकांची लक्षणीय उपस्थिती

0

Nature: अकोले: प्रत्येकाने आपल्या घराजवळ एक तरी झाड लावले पाहिजे व त्याचे संगोपन केले पाहिजे. नैसर्गिक फळझाडे, पालेभाज्या व रानभाज्या तुमच्या घरच्या व शाळेच्या परसबागेत वाढवल्या पाहिजेत. खरेतर निसर्गाशी (Nature) मैत्री करा आणि आनंदी रहा, असे आवाहन पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपेरे यांनी केले. अकोलेतील हिंद सेवा मंडळाच्या ज्ञानवर्धिनी प्राथमिक शाळा व बालकमंदिर येथे क्रीडा व कला स्पर्धांचे पारितोषिक वितरण पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना निसर्गाचे महत्त्व पटवून दिले. घरची परिस्थिती कशीही असो लढायला शिका. सातत्याने पुढे जात रहा. प्रत्येक घरातील कन्या ही त्या घराची, परिसराची लक्ष्मी असते, तिला शिक्षणाच्या प्रवाहात आणले पाहिजे व माझ्यासारख्याच अनेक पद्मश्री या निसर्गसंपन्न अकोले तालुक्याच्या मातीतून पुढे आल्या पाहिजे अशा भावना व्यक्त केल्या.

अवश्य वाचा-  आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या वाहनांना मिळणार टोलमाफी;एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा  

महिला पालकांची लक्षणीय उपस्थिती (Nature)


याप्रसंगी तिसरी व चौथीच्या विद्यार्थिनींनी रंगभरण स्पर्धेतून राहीमावशींचे सुंदर रंगभरण केलेले चित्र त्यांना भेट म्हणून दिले. मुख्याध्यापक रावसाहेब नवले यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून हिंद सेवा मंडळाचे कार्यकारिणी सदस्य दिलीप शहा, शालेय संचालिका पुष्पा वाणी, सुरेखा धर्माधिकारी, प्रभावती महाले यांसह महिला पालकांची उपस्थिती लक्षणीय होती. अध्यक्षस्थान शाळेच्या अध्यक्षा स्मिता मुंदडा यांनी भूषविले. अध्यक्षीय सूचना व आभार शिक्षिका सोनाली मालवणकर यांनी मानले. सूत्रसंचालन बाळासाहेब मांडे यांनी केले. यादीवाचन दत्ताभाऊ पोपेरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी विशेष प्रयत्न केले. महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.