Kalabhairava | पाथर्डी : पाथर्डी (Pathardi) शहरासह संपूर्ण तालुक्यात प्रसिद्ध असलेल्या शिरसाटवाडी येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ (Kalabhairava) यांच्या यात्रेसह पालखी सोहळा यंदा अवकाळी पावसाच्या सावटातही मोठ्या उत्साहात झाला. पावसाच्या सरींनाही न जुमानता ग्रामस्थ व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत भक्तीचा अनोखा जल्लोष अनुभवला. चैत्र पौर्णिमेनिमित्त आयोजित या पारंपरिक तीन दिवसीय यात्रेची सुरुवात कावडी मिरवणुकीने झाली.
हे वाचा – निसर्गाशी मैत्री करा आणि आनंदी रहा: पद्मश्री राहीबाई पोपेरे
संपूर्ण गाव भक्तिमय (Kalabhairava)
भाविकांनी गंगाजल आणून श्रींचा विधिवत अभिषेक केला. त्यानंतर रात्री निघालेल्या पालखी व छबिना मिरवणुकीने संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले. ढोल-ताशा, बँड पथकांच्या गजरात, डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई आणि आकर्षक विद्युत रोषणाईने सजवलेला रथ यामुळे मिरवणुकीला विशेष रंगत आली. चांदीच्या अश्वारूढ मूर्तीची पालखी हे प्रमुख आकर्षण ठरले. मिरवणुकीदरम्यान आगीचे टेंबे पेटवून पालखी पुढे नेण्याची प्राचीन परंपरा यंदाही जपली गेली.
अवश्य वाचा- आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या वाहनांना मिळणार टोलमाफी;एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
मंदिरासमोर फटाक्यांची आतषबाजी (Kalabhairava)
मंदिर परिसरात भरलेल्या यात्रेत विविध स्टॉल्सनी जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. खाद्यपदार्थ, खेळणी, महिलांसाठी खरेदी साहित्य, घरगुती वस्तू आणि थंडपेयांची दुकाने यामुळे भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. रात्री ‘नटखट सुंदरा’ या ऑर्केस्ट्रा कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यानंतर छबिना मिरवणुकी वेळी मंदिरासमोर आकर्षक फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. श्री काळभैरवनाथ हे नवसाला पावणारे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. त्यामुळे बाहेरगावी असलेले ग्रामस्थही यात्रेसाठी गावात परत येतात. सासरी गेलेल्या मुलींची उपस्थिती, नवीन कपड्यांची परंपरा आणि पाहुणचारामुळे गावात उत्सवी व लग्नसराईसारखे वातावरण निर्माण झाले होते. यातून पाथर्डी शहराची बाजारपेठ व्यावसायिक दृष्ट्या फुलली जाते.गावातील पदाधिकारी, ग्रामस्थ व यात्रा समितीच्या सहकार्याने संपूर्ण सोहळा शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवरही भक्तिभावाने उजळलेली ही यात्रा भाविकांसाठी संस्मरणीय ठरली.



