Rahuri Assembly Constituency : राहुरी : राहुरी विधानसभा (Rahuri Assembly Constituency) पोटनिवडणुकीच्या अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. निवडणुकीतील संभाव्य उमेदवार माजी मंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी निवडणुकीत अर्ज दाखल न करण्याचा निर्णय घेतला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan), पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी थेट तनपुरे यांच्या संपर्क कार्यालयात जाऊन चर्चा केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत प्राजक्त तनपुरे यांनी हा निर्णय घेतला.परिणामी निवडणूक बिनविरोध होणार नसली तरी निवडणुकीतील चूरस मात्र संपुष्टात आली आहे.
अवश्य वाचा: मोबाईल व घरातील दागिने घेऊन नवरी पसार; पाथर्डी तालुक्यातील घटना
तनपुरे समर्थकांची मोठ्या संख्येने गर्दी
माजी मंत्री प्राजक्त तनपुरे अपक्ष अर्ज भरणार असल्याची जोरदार चर्चा असतानाच आज सकाळी राहुरीतील प्राजक्त तनपुरे यांच्या संपर्क कार्यालयात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील लवाजम्यासह दाखल झाले. यावेळी तनपुरे यांनी त्यांचे स्वागत करत आपल्या दालनामध्ये पाऊण तास विविध विषयांवर चर्चा केली .यावेळी संपर्क कार्यालयात व कार्यालयाबाहेर तनपुरे समर्थकांची मोठ्या संख्येने गर्दी झाली होती .
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
महायुतीचे सरकार तनपुरे यांच्याबरोबर (Rahuri Assembly Constituency)
यावेळी, अनेक खलबते झाल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष चव्हाण म्हणाले की, तनपुरे कुटुंबीयांचे परिसरात मोठे वलय असून चांगला लोकप्रतिनिधी त्यांच्या परिवाराला लाभला आहे. पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणे झालेले आहे. मतदार संघाच्या दृष्टीने आम्ही तनपुरे यांना विनंती केली आहे. प्राजक्त तनपुरे व त्यांच्या सहकारी कार्यकर्त्यांना विनंती आहे की, महायुतीचे सरकार प्राजक्त तनपुरे यांच्याबरोबर आहे. ते जे म्हणतील त्या विकासात्मक मागण्यांबाबत महायुती सरकार सकारात्मक राहून सहकार्य करेल.
पुढील निर्णय प्राजक्त तनपुरे यांच्यावर सोडला
तसेच डॉ . तनपुरे कारखान्याबाबत जो प्रस्ताव आलेला आहे, त्यावर मीच प्रमुख असलेले पार्लमेंटरी बोर्ड विचार करेल. त्यामुळे याबाबतही सकारात्मक विचार केला जाईल. पुढील निर्णय प्राजक्त तनपुरे यांच्यावर सोडला आहे, असे म्हणून चव्हाण व पालकमंत्री विखे पाटील पुढील दौऱ्यासाठी संपर्क कार्यालयातून रवाना झाले. त्या आधी याच कार्यालयात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले, राहुरी तालुक्यातील विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्यातील महायुती सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. तनपुरे सांगतील त्या विकास योजनांसाठी सर्व सहकार्य केले जाईल.
माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले की विकासाच्या प्रश्नांवर आपण ही निवडणूक लढविणार होतो, पण सरकारच्या वतीने विकासासाठी विशेष लक्ष देण्याची चर्चा झाली. त्यामुळे मी सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून अर्ज दाखल न करण्याचा निर्णय घेतला आहे.



