Dharna movement: घुलेवाडीकरांचा पाण्यासाठी एल्गार; ग्रामपंचायतीसमोर धरणे आंदोलन

आंदोलनादरम्यान महिला व नागरिकांचा तीव्र संताप

0

Dharna movement: संगमनेर: शहरालगत असलेल्या घुलेवाडी गावात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्याप सुटलेला नसून, नागरिकांनी अखेर तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. जलजीवन मिशनसारख्या मोठ्या योजना राबवूनही घुलेवाडीकरांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याने ग्रामपंचायत कार्यालयासमोर धरणे आंदोलन (Dharna movement) करण्यात आले. गावात साखर कारखाना तसेच मोठ्या सहकारी संस्था अस्तित्वात असतानाही नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याची संतप्त भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. साखर कारखान्यामुळे विहिरींचे पाणी दूषित झाल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला.

अवश्य वाचा- भोंदू अशोक खरातने सख्ख्या नातलगांनाही फसवलं;परिवहन अधिकाऱ्यांच्या नावेही फसवणूक

आंदोलनादरम्यान महिला व नागरिकांचा तीव्र संताप (Dharna movement)

आंदोलनादरम्यान महिलांनी व नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत, “आम्ही पाणीपट्टी व नळपट्टी भरतो, मात्र पाणी मिळत नाही”, “गावात पाणपोई आहे पण त्यात पाणी नाही”, “दररोज जारचे पाणी विकत घेऊन पिण्याची वेळ आली आहे, त्यामुळे आजार वाढत आहेत” अशा तक्रारी मांडल्या. “पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे!” आणि “पाणी सोडा, नाहीतर ग्रामपंचायत सोडा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. गेल्या अनेक दिवसांपासून तीव्र झालेल्या पाणीटंचाईमुळे महिलांना उन्हात मैलोन्‌मैल पायपीट करावी लागत असून, जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. वारंवार मागणी करूनही ग्रामपंचायतीकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. आंदोलनादरम्यान ग्रामस्थांनी प्रशासनासमोर तात्काळ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा, पाणीपुरवठा योजनेतील तांत्रिक बिघाड २४ तासांत दुरुस्त करावा , सर्व वाड्या-वस्त्यांवर समन्यायी पाणीपुरवठा करावा, कायमस्वरूपी उपाययोजना आराखडा सादर करावा, २०१७-१८ मधील योजनेची चौकशी करून माहिती जाहीर करावी, संबंधित पदाधिकाऱ्यांवर कारवाई करावी, जलजीवन मिशन अंतर्गत भेंडाळे धरण पाझर तलावाच्या कामातील विलंबाचे कारण स्पष्ट करावे, संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी व वाढीव प्रस्तावाची माहिती द्यावी या मागण्या ठेवल्या केल्या आहेत. दरम्यान, या आंदोलनामुळे प्रशासनाची झोप उडाली असून, लवकरच ठोस निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.