Super Duper Movie : सध्या चित्रपटगृहांमध्ये ‘सुपर डुपर’ या मराठी (Super Duper Movie) चित्रपटाची जबरदस्त चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. कथानकाची ताकद, कलाकारांची प्रभावी कामगिरी आणि मनाला भिडणारी मांडणी यामुळे प्रेक्षकांनी या चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. विशेष म्हणजे, बॉलिवूडचे मोठे चित्रपट स्पर्धेत असतानाही प्रेक्षकांनी ‘सुपर डुपर’ला (Marathi Movie) प्राधान्य दिले, ही बाब या चित्रपटाच्या यशाची साक्ष देणारी ठरते.
नक्की वाचा: अल्लू अर्जुनच्या वाढदिवशी चाहत्यांना मोठे सरप्राईज; ॲटलीसोबत दिग्दर्शक ‘या’ अॅक्शन चित्रपटाची घोषणा
चित्रपट पाहिल्यानंतर अनेक प्रेक्षकांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की, “आजकाल सगळे जण वेगवेगळ्या गोष्टींमध्ये व्यस्त असतात, परंतु ‘सुपर डुपर’ हा असा चित्रपट आहे जो तिन्ही पिढ्या एकत्र बसून आनंदाने पाहू शकतात.” कुटुंबातील प्रत्येक सदस्याला जोडणारा, हसवणारा आणि भावूक करणारा हा चित्रपट असल्यामुळे चित्रपटगृहात कौटुंबिक प्रेक्षकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांसह समीक्षकही या चित्रपटाचे कौतुक करत आहेत.
फक्त मराठी प्रेक्षकच नाही, तर अमराठी प्रेक्षकही या चित्रपटाकडे आकर्षित होत असून, भाषेच्या पलीकडे जाऊन ‘सुपर डुपर’ची कथा सर्वांच्या मनात घर करत आहे. चित्रपटातील प्रसंग, संवाद आणि संगीत यामुळे प्रेक्षकांचा अनुभव अधिक समृद्ध होत असल्याचेही अनेकांनी नमूद केले आहे.
दिग्दर्शक समीर पाटील म्हणाले की…(Super Duper Movie)
या यशाबद्दल दिग्दर्शक समीर पाटील म्हणतात, “प्रेक्षकांनी इतक्या प्रेमाने चित्रपट स्वीकारला, ही आमच्यासाठी खूप मोठी आणि समाधान देणारी गोष्ट आहे. आम्ही एक असा चित्रपट बनवण्याचा प्रयत्न केला जो कुटुंबातील प्रत्येक सदस्याला भावेल, त्यांना एकत्र आणेल आणि त्यांना हसवतानाच भावूकही करेल. आज चित्रपटगृहात प्रेक्षक एकत्र बसून चित्रपटाचा आनंद घेताना पाहाणे, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान अनुभवणे यापेक्षा मोठे यश आमच्यासाठी काहीच असू शकत नाही.”
झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर यांनी सांगितले की, “सुपर डुपर चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद अतिशय सकारात्मक आहे. विशेष म्हणजे प्रेक्षक सहकुटुंब एकत्र येऊन चित्रपटगृहात गर्दी करत आहेत, हे मराठी चित्रपटसृष्टीसाठी आशादायी चित्र आहे. बऱ्याच दिवसांनी खऱ्या अर्थाने एक फॅमिली फिल्म आली असून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात ती यशस्वी ठरत आहे, याचा आनंद आहे. येणाऱ्या दिवसांतही हा हाऊसफुल प्रतिसाद असाच कायम राहील, असा विश्वास आहे.”
चित्रपटातील कलाकार कोण? (Super Duper Movie)
झी स्टुडिओज प्रस्तुत, नाईंटी नाईन प्रॉडक्शन्स आणि सिद्धिविनायक प्रॉडक्शन्स निर्मित ‘सुपर डुपर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात निर्मिती सावंत, ललित प्रभाकर, विदुला चौगुले, शशांक शेंडे, हृषिकेश जोशी, नम्रता संभेराव, कुशल बद्रिके, प्रतीक्षा कोते यांच्या प्रमुख भूमिका आहेत. समीर आशा पाटील दिग्दर्शित या चित्रपटाचे निर्माते विजय शिंदे आणि नरेश बोर्डे असून, उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर प्रस्तुतकर्ता आहेत. तर संजय जाधव यांनी छायांकनाची जबाबदारी सांभाळली आहे.



