Civil District Hospital : नगर : जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या (Civil District Hospital) नेत्र विभागातर्फे राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत (National Programme for Control of Blindness) ५५ रुग्णांच्या मोतिबिंदू शस्त्रक्रिया (Cataract Surgery) यशस्वीपणे पूर्ण करण्यात आल्या. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे (Dr. Sanjay Ghogare) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या मोहिमेमुळे ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्ण व ज्येष्ठ नागरिकांना नवी दृष्टी लाभली असून त्यांनी या मोफत आरोग्य सेवेबद्दल समाधान व्यक्त केले आहे. या यशस्वी उपक्रमात संगमनेर, साकूर, तळेगाव, लोणी, राहता, श्रीरामपूर, कर्जत, जामखेड व नगर या तालुक्यातील ५५ रुग्णांचा समावेश होता.
नक्की वाचा : बेकायदेशीर गोवंशीय कत्तलखान्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
शस्त्रक्रिया मोहिम पार पाडण्यात सहभाग
या शस्त्रक्रिया मोहिमेचे नियोजन जिल्हा नेत्रशल्यचिकित्सक वर्ग-१ डॉ. संतोष रासकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. नेत्रतज्ज्ञ डॉ. भूषण अनभुले, डॉ. साजिद तांबोळी, डॉ. अजिता गरुड, डॉ. ज्योती शिंदे व डॉ. सुप्रिया सोनवणे यांनी प्रत्यक्ष शस्त्रक्रिया पार पाडल्या. या कार्यात नोडल अधिकारी संतोष चौधरी, नेत्रचिकित्सा अधिकारी मधुकर जत्ती, पाचारणे, रामानंद, भुईगळ, स्वाती गायकवाड, सांगारे, इन्चार्ज सिस्टर डापसे व परिचारिका कर्मचारी तसेच शस्त्रक्रियागृह विभागातील कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
शस्त्रक्रिया करण्यात आल्या पूर्णतः मोफत (Civil District Hospital)
रुग्णालयामार्फत या शस्त्रक्रिया पूर्णतः मोफत करण्यात आल्या असून रुग्णांची ने-आण, निवास, भोजन व आवश्यक औषधोपचारांची उत्तम व्यवस्था रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आली होती. ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळाल्याने त्यांच्या नातेवाईकांनीही रुग्णालय व्यवस्थापनाचे आभार मानले आहेत. राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यामध्ये नेत्र रुग्णांना सातत्याने अशा प्रकारची उत्तम सेवा पुरवली जात आहे.
या शिबिरादरम्यान केवळ वैद्यकीय उपचारच नव्हे तर सामाजिक प्रबोधनावरही भर देण्यात आला. सतीश अहिरे यांनी उपस्थित रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना अवयव दानाचे महत्त्व पटवून देत त्याबाबत सविस्तर समुपदेशन केले. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या या उपक्रमामुळे जिल्ह्यातील अंधत्व निर्मूलन मोहिमेला मोठे बळ मिळाले असून सर्व स्तरांतून या कार्याचे कौतुक होत आहे.



