नगर : भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat Case) याच्या काळ्या कारनाम्यांचे धागेदोरे राजकीय वर्तुळातील नातेसंबंधा पर्यंत पोहोचले आहेत. आता याच प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्या बहीण प्रतिभा चाकणकर (Pratibha Chakankar) यांचं देखील नाव समोर आलं आहे. आज शिर्डी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी त्या हजर झाल्या आहेत. समता पतसंस्थेतील संशयास्पद कोट्यवधींच्या व्यवहाराप्रकरणी पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली होती.
नक्की वाचा: भोंदू अशोक खरातने सख्ख्या नातलगांनाही फसवलं;परिवहन अधिकाऱ्यांच्या नावेही फसवणूक
नेमके प्रकरण काय? (Ashok Kharat Case)
अशोक खरात विरोधात शिर्डीत बेकायदेशीर सावकारी आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. तपासादरम्यान पोलिसांना ‘समता पतसंस्थेत’ खरातशी संबंधित १३२ संशयास्पद खाती आढळली आहेत, ज्यामध्ये खरात हा ‘नॉमिनी’ आहे. धक्कादायक बाब म्हणजे, यातील ४ खाती प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या मुलांच्या नावे आहेत.
अवश्य वाचा: ‘मागासवर्गीय समुदायाचे सदस्य असणे हा सरकारी नोकरीत सवलत मिळवण्याचा आधार नाही’- सर्वोच्च न्यायालय
२ कोटी ४० लाखांचा संशयास्पद व्यवहार (Ashok Kharat Case)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिभा चाकणकर यांच्या नावे २ खाती तर त्यांच्या मुलांच्या नावे २ खाती आहेत. या चारही खात्यांवरून एकूण २ कोटी ४० लाख रुपयांचे मोठे व्यवहार झाले आहेत. या पैशांचा स्रोत काय ? हे पैसे खरातच्या सावकारी व्यवसायाशी संबंधित आहेत का? आणि या व्यवहारांमागे खरातचा नेमका हेतू काय होता? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी शिर्डी पोलिसांनी चाकणकर यांचा जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे.
अशोक खरातशी असलेल्या संबंधांच्या आरोपावरून रुपाली चाकणकर यांनी याआधीच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आता त्यांच्या सख्ख्या बहिणीची पोलीस चौकशी सुरू झाल्याने या प्रकरणाला मोठे राजकीय वळण मिळाले आहे. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणाशी संबंधित ३३ खातेदारांचे जबाब नोंदवले आहेत. मात्र, चाकणकर कुटुंबाशी संबंधित असलेल्या या खात्यांमधील मोठी रक्कम पाहता, प्रतिभा चाकणकर यांचा जबाब या संपूर्ण तपासातील सर्वात महत्त्वाचा दुवा मानला जात आहे. आता प्रतिभा चाकणकर काय जबाब नोंदवणार? यावरच या प्रकरणाचा पुढील तपास ठरणार आहे.



