Madhi | नगर : पाथर्डी (Pathardi) तालुक्यातील मढी (Madhi) यात्रेसह विविध ठिकाणांहून दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश करत चार आरोपींना जेरबंद केले आहे. या कारवाईत १२ दुचाकीसंह एकूण तीन लाख ५३ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून सात गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
नक्की वाचा : देवदैठण येथे बाप-लेक पाण्यात बुडाले; मुलाला वाचवण्यात यश तर वडिलांचा मृत्यू
चार आरोपी जेरबंद (Madhi)
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींमध्ये महेश मारुती कांदळकर (वय २४), अजय रेवजी कांदळकर (वय २२), जावेद समद बेग (वय १८) आणि विकास बाळासाहेब जाधव (वय १९, सर्व रा. अशोकनगर, ता. श्रीरामपूर) यांचा समावेश आहे. याबाबतची फिर्याद दत्तात्रय भागवत म्हस्के (रा. रेणुकाईवाडी, ता. पाथर्डी) यांनी दिली होती. ८ मार्च २०२६ रोजी त्यांच्या दुचाकीची चोरी झाल्याने पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हे वाचा – राहुरीत एमआयडीसी उभारणार; युवकांना अक्षय कर्डिले यांचे रोजगाराचे आश्वासन
स्थानिक गुन्हे शाखेचा सापळा (Madhi)
जिल्ह्यात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते. १२ एप्रिल २०२६ रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे श्रीरामपूर परिसरात सापळा रचण्यात आला. अशोकनगर-मातापूर रोडवरील रेल्वे पुलाजवळ दोन दुचाकीनवर आलेल्या चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्यांनी मढी यात्रा, देहरे टोल नाका तसेच संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर परिसरातून दुचाकी चोरी केल्याचे पोलीस तपासांत समोर आले.
हे पहा – इराणसोबतची चर्चा का फिस्कटली? अमेरिकेनं सांगितलं…
आरोपींकडून ३ लाख २९ हजार रुपये किमतीच्या १२ दुचाकी, ३४ हजार रुपये किमतीचे पाच मोबाईल फोन आणि चोरीसाठी वापरण्यात येणारी साधने असा एकूण ३ लाख ५३ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक हरीश भोये, पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, व पोलीस अंमलदार दीपक घाटकर, सुरेश माळी, अतुल लोटके, विष्णू भागवत, फुरकान शेख, बाळासाहेब नागरगोजे, रिचर्ड गायकवाड, रमिजराजा अत्तार, विशाल तनपुरे, प्रशांत राठोड, अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ, भगवान थोरात, योगेश कर्डिले, प्रकाश मांडगे, महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत, चालक भगवान धुळे, अरुण मोरे यांच्या पथकाने केली.



