Duttadham Govt:संगमनेर: तालुक्यातील वडगाव पान आणि मनोली गावच्या शिवारावर आश्रम थाटून ‘दत्तधाम सरकार’ (Duttadham Govt) उर्फ गडगेबाबा याने सुरू केलेल्या भोंदूपणाविरोधात आता कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. दैवी शक्तीच्या नावाखाली दुर्धर आजार बरे करण्याचा दावा करणाऱ्या या बाबाने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) पदाधिकारी ॲड. रंजना पगार गवांदे यांची कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून बदनामी केल्याप्रकरणी संगमनेर ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.वडगाव पान शिवारात आश्रम चालवणारा गडगेबाबा हा आपल्या ‘दत्तधाम सरकार’ या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून कॅन्सर, वंध्यत्व आणि इतर दुर्धर आजार मंत्रशक्तीने बरे करण्याचा खोटा दावा करत असल्याची तक्रार करण्यात आली होती. या भोंदूपणाविरोधात ३० मार्च २०२६ रोजी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर सातत्याने प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा सुरू होता. आपले पितळ उघडे पडत असल्याचे पाहून गडगेबाबाने काही भक्तांच्या मदतीने एक बनावट व्हिडिओ तयार केला. या व्हिडिओमध्ये ॲड. रंजना पगार गवांदे यांचे छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने वापरून, अंनिस आणि पोलीस खंडणी मागत असल्याचा खोटा आरोप करण्यात आला.
अवश्य वाचा- भाजपला विधान परिषदेत जास्त जागा मिळणार : छगन भुजबळ
अंनिसच्या प्रतिमेला तडा देण्याचा प्रयत्न (Duttadham Govt)
हा बदनामीकारक व्हिडिओ ‘दत्तधाम सरकार’ या इंस्टाग्राम पेजवरून व्हायरल करण्यात आला, ज्यामुळे अंनिसच्या प्रतिमेला तडा देण्याचा प्रयत्न झाला. १३ एप्रिल रोजी पंचायत समिती आरोग्य अधिकाऱ्यांकडे बाबाच्या औषध साठ्याची आणि परवान्यांची चौकशी करण्यासाठी अर्ज देण्यात आला. १६ एप्रिल रोजी विभागीय पोलीस अधिकारी आणि उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सविस्तर तक्रार अर्ज दाखल करण्यात आला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. समितीने स्पष्ट केले आहे की व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या किंवा पैशांची मागणी करणाऱ्या व्यक्तींचा अंनिसशी कोणताही संबंध नाही. संबंधित बदनामीकारक व्हिडिओचा पुरावा (पेन ड्राईव्ह) पोलिसांकडे सुपूर्त करण्यात आला आहे. यापुढे कोणत्याही व्यक्तीने हा बनावट आणि बदनामीकारक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्यास त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात येईल. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस आता या ‘हायटेक’ भोंदूगिरीच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहेत.



