
Rahuri Elections : नगर : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत मतदारांनी १०० टक्के मतदान करून लोकशाही बळकट करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे. लोकशाही ही देशाची सर्वात मोठी ताकद असून मतदानाचा हक्क हा तिचा कणा आहे. या हक्काचा योग्य वापर केल्यास स्थानिक विकासाला दिशा देता येते. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व मतदारांनी १०० टक्के मतदानासाठी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी नमूद केले.
हेही वाचा : राहुरी विधानसभा पोटनिवडणूक; मतदान केंद्रांच्या २०० मीटर परिसरात निर्बंध लागू
सक्रिय सहभाग नोंदवा (Rahuri Elections)
मतदान हा केवळ अधिकार नसून कर्तव्यही आहे. आपल्या एका मतामुळे सक्षम नेतृत्वाची निवड होऊ शकते. त्यामुळे कोणत्याही दबावाला बळी न पडता निर्भयपणे व प्रामाणिकपणे मतदान करावे. मतदानाच्या दिवशी कुटुंबातील सर्व पात्र सदस्यांसह मतदान केंद्रावर जाऊन आपले कर्तव्य बजावावे, असे आवाहन त्यांनी केले. ‘माझे मत – माझा हक्क, माझा सहभाग’ या भावनेतून लोकशाही अधिक मजबूत व समृद्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गुरुवार, २३ एप्रिल २०२६ रोजी होणाऱ्या या पोटनिवडणुकीत शंभर टक्के मतदान घडवून आणण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही त्यांनी आवाहन केले.
नक्की पहा : महिला आरक्षण मोर्चावेळी महिलेने महाजन यांना विचारला जाब
आपले कर्तव्य बजावावे (Rahuri Elections)
मतदारसंघातील जास्तीत जास्त मतदारांनी २३ एप्रिल रोजी मतदान करून लोकशाहीप्रती आपले कर्तव्य बजावावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी दत्तात्रय कवितके, स्वीप नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकारी श्रीमती संध्या गायकवाड, उपशिक्षणाधिकारी आकाश दरेकर, मीना शिवगुंडे, मतदारदूत डॉ. अमोल बागूल तसेच स्वीप समिती सदस्यांनी केले आहे.


