Veterinary Services : टोल फ्री हेल्पलाइनमुळे पशुवैद्यकीय सेवा थेट शेतकऱ्यांच्या दारात‌; लाखो तक्रारींचे निराकरण

0
Veterinary Services : टोल फ्री हेल्पलाइनमुळे पशुवैद्यकीय सेवा थेट शेतकऱ्यांच्या दारात‌; लाखो तक्रारींचे निराकरण
Veterinary Services : टोल फ्री हेल्पलाइनमुळे पशुवैद्यकीय सेवा थेट शेतकऱ्यांच्या दारात‌; लाखो तक्रारींचे निराकरण

Veterinary Services : नगर : पशुसंवर्धन विभागाच्या १९६२ टोल फ्री क्रमांक व मोबाईल वेटरनरी क्लिनीकमधील तांत्रिक समन्वयामुळे राज्यातील पशुपालकांना त्यांच्या दारापर्यंत पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध होत असून, वर्षभरात प्राप्त ४ लाख १ हजार ९९२ कॉल्सपैकी ३ लाख ७८ हजार ३५ तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे, अशी माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी दिली. या सेवेमुळे दुर्गम भागातील ३४ हजार ९७९ पशुपालकांना थेट लाभ मिळाला असून अद्ययावत तंत्रज्ञान व फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या नियोजनामुळे जनावरांना वेळेत उपचार मिळत आहेत. पशुधन हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचे मुख्य आधार असल्याने त्यांच्या आरोग्याचे संरक्षण महत्त्वाचे ठरत आहे.

हेही वाचा :  राहुरी विधानसभा पोटनिवडणूक; मतदान केंद्रांच्या २०० मीटर परिसरात निर्बंध लागू

हेल्पलाइनद्वारे तातडीचे औषधोपचार

आणीबाणीच्या प्रसंगी उपचारासाठी लागणाऱ्या ‘गोल्डन अवर’चा प्रभावी उपयोग या सेवेमुळे होत असून कॉल केल्यानंतर सुमारे दीड तासात पशुवैद्यकीय पथक घटनास्थळी पोहोचत आहे. त्यामुळे वर्षभरात २९ हजार १३० मोठे व ३५ हजार ५६९ लहान अशा एकूण ६४ हजार ७५९ पशुधनाचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. १९६२ हेल्पलाइनद्वारे तातडीचे औषधोपचार, लहान व मोठ्या शस्त्रक्रिया, शास्त्रीय पद्धतीने खच्चीकरण, कृत्रिम रेतन, जंतनाशक उपाययोजना, लसीकरण व वंध्यत्व तपासणी यांसारख्या विविध सेवा पुरवल्या जात आहेत. तसेच नैसर्गिक आपत्ती, भाजणे व सर्पदंश अशा आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद दिला जात आहे. पशुपालकांना पशुआरोग्य, आहार व्यवस्थापन व शासकीय योजनांची माहितीही उपलब्ध करून दिली जात आहे.

नक्की पहा : करंजी घाटात पिकअप व कारची समोरासमोर धडक; चार जण जखमी

दुग्धव्यवसायाला फायदा (Veterinary Services)

पूर्वी जनावरांना दवाखान्यात नेण्यासाठी लागणारा खर्च व कष्ट कमी झाले असून आता तज्ज्ञ पशुवैद्यक थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचत आहेत. कॉल सेंटरमध्ये अद्ययावत सॉफ्टवेअर, कॉल रेकॉर्डिंग व फीडबॅक प्रणालीचा वापर करून सेवेचा दर्जा सुधारला जात आहे. आगामी काळात कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित प्राथमिक सल्ला व व्हॉट्सअॅप चॅटबॉटचा समावेश करण्याचे नियोजन असून प्रत्येक कॉलचे अचूक ट्रॅकिंग व पशुवैद्यकांच्या कामगिरीचे मूल्यमापन सुलभ होणार आहे. या डिजिटल प्रणालीमुळे पशुधनाची हानी कमी होऊन दुग्धव्यवसाय अधिक शाश्वत व फायदेशीर ठरत असल्याची माहिती पाटील यांनी दिली.