Revenue Department : महसूल विभागाचे जुने कायदे बदलून प्रशासन लोकाभिमुख करणार : चंद्रशेखर बावनकुळे

0
Revenue Department : महसूल विभागाचे जुने कायदे बदलून प्रशासन लोकाभिमुख करणार : चंद्रशेखर बावनकुळे
Revenue Department : महसूल विभागाचे जुने कायदे बदलून प्रशासन लोकाभिमुख करणार : चंद्रशेखर बावनकुळे

Revenue Department : नगर : राज्याचे महसूल खाते हे नागरिकांच्या मालमत्तेचे रक्षण करते. त्यामुळे जुन्या महसूल कायद्यांमधील क्लिष्ट प्रक्रिया कमी करून सर्वसामान्यांना जलद न्याय देण्यासाठी कायदे बदलण्यात येत आहेत, असे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांची थेट सोडवणूक करण्यासाठी शिर्डी अपर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जनता दरबारात ते बोलत होते.

हेही वाचा : अहिल्यानगर तालुक्यातील वाळुंज बायपास शिवारात बसचा अपघात; २० जण जखमी  

ड्रोनच्या साहाय्याने मोजणी

महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले, शेतीच्या रस्त्यांचे वाद मिटवण्यासाठी पुढील पाच वर्षांत सर्व पाणंद रस्ते बारमाही केले जातील व त्यांच्या कडेला वृक्षलागवड केली जाईल. सातबारा उताऱ्यावरील मृत व्यक्तींचे नाव कमी करण्यासाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी तहसीलदारांनी स्वतःहून ही दुरुस्ती करावी. जमिनीच्या मोजणीसाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी खासगी मोजणीदार नेमून ड्रोनच्या साहाय्याने केवळ पंधरा दिवसांत मोजणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
महसूल विभागातील प्रलंबित प्रकरणांबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. अधिकाऱ्यांनी त्यांच्याच स्तरावर नागरिकांचे प्रश्न सोडवले तर लोकांना मंत्रालयात येण्याची वेळ येणार नाही. महसुली प्रकरणांच्या सुनावणीत तारखांवर तारखा न देता केवळ दोन तारखांमध्ये निर्णय घेण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. दुसऱ्या तारखेला लेखी युक्तिवाद न आल्यास एकतर्फी आदेश काढले जातील, असे त्यांनी सांगितले.

नक्की पहा : नाशिक हादरलं! ‘दैवी शक्ती’च्या नावाखाली महिलेचं शोषण… भोंदू बाबावर गुन्हा

प्रशासन कटिबद्ध (Revenue Department)

नागरिकांची कामे वेळेत व्हावीत यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. अधिकाऱ्यांकडे जाऊनही काम पूर्ण न झाल्यास नागरिकांनी माझ्या व्हॉट्सॲप क्रमांकावर स्वतःचे नाव व कामाचा तपशील पाठवावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, शैलेश हिंगे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, माजी आमदार स्नेहलता कोल्हे आदी उपस्थित होते.