
नगर: भोंदू अशोक खरात, संगमनेर येथील गडगेबाबा यांचे प्रकरण ताजे असताना श्रीरामपुरात (Shrirampur Crime) भोंदूगिरी व महिलेवर अत्याचार (Assault on a Woman) करणाऱ्या एका भोंदू बाबाला शहर पोलिसांनी अटक केली आहे. गणेश शिंदे (Ganesh Shinde) असे या भोंदूचे नाव असून, त्याने पेढ्यातून गुंगीचे औषध देत महिलेवर वेळोवेळी अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या भोंदूने पिडित महिलेकडून १८ ते २० लाख रुपयेही उकळल्याचे समोर आले आहे.
नक्की वाचा: राजीव गांधी विद्यार्थी अपघात अनुदान योजनेचे वितरण आता एका क्लिकवर
प्रकरण नेमकं काय आहे? (Shrirampur Crime)

भोंदू बाबा गणेश शिंदे हा लोकांचं आजारपण तसेच आर्थिक अडचणीतील भक्तांचा गैरफायदा घेत होता. बेलापूर येथील पढेगाव रस्त्यावरील खटकळी गावठाण येथील हा भोंदूबाबा आहे. त्याला शहर पोलिसांनी सोमवारी संध्याकाळी ताब्यात घेतले. या भोंदू विरुद्ध एका पीडित महिलेने अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. शिंदे हा त्याच्या राहत्या घरातूनच आश्रम चालवत होता. बेलापूर व श्रीरामपूर शहरातील शेकडो नागरिक हे त्याचा भक्त परिवार होता. दररोज पाचशेपेक्षा अधिक लोक शिंदे याच्याकडे आपल्या समस्या घेऊन जात होते. गुरुपौर्णिमेनिमित्त हजारो भाविकांचा उत्सव इथे भरत होता. इतर दिवशी त्याच्याकडे कंदुरीचा प्रसाद केला जात होता.
अवश्य वाचा: ‘लालपरी’चं ग्लॅमर वाढणार! रितेश- जिनिलिया ST चे ब्रॅण्ड अॅम्बेसिडर
भोंदूबाबा शिंदेच्या विरुद्ध तक्रार देणारी पीडित महिला ही बेलापूर परिसरातील आहे. तिला एक आजार जडलेला होता. त्या आजारातून आपली सुटका होईल, या अपेक्षेने तीन वर्षापूर्वी ती गणेश शिंदे बाबाकडे गेली होती. शिंदे बाबा याने तिला लिंबू व उदिक वापरून इलाज केला. त्यातून बरे वाटल्याचा महिलेचा गैरसमज झाला. त्यामुळे तिचे बाबाकडे जाणे वाढले होते. बाबाने एक दिवस या महिलेला पेढ्याचा प्रसाद दिला. त्यानंतर घराच्या मागे नेऊन तिच्यावर अत्याचार केला, असे फिर्यादीत नमूद आहे. शहर पोलिसांनी शिंदे याच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी तसेच जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. त्यामुळे या गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.
गणेश शिंदे नेमके कोण? (Shrirampur Crime)
भोंदू गणेश शिंदे हा गेल्या १० वर्षापासून खटकळी गावठाण येथे आश्रम चालवत होता. त्याचे प्रस्थ गेल्या काही वर्षामध्ये कमालीचे वाढले होते. शिंदे हा त्या आधी बेलापूर येथे हमालीचे काम करत होता. त्याचे शिक्षण जेमतेम झालेले असून त्याचे वय ४१ वर्षे आहे. दहा वर्षांपासूनच त्याने आध्यात्मिक क्षेत्रात प्रवेश केला. पोलिसांनी सोमवारी शिंदे याच्यावर गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास आता सुरू झाला आहे. खरात याच्या प्रमाणे गणेश शिंदे याच्या कृत्यांची माहिती त्याच्याच जवळच्या लोकांनी बाहेर फोडल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून शिंदे याची काही प्रकरणे चव्हाट्यावर आली होती. मात्र, त्यात तडजोड होऊन मिटवली गेली होती. मात्र आता त्याची आणखी कोणते कृत्ये बाहेर येणार हेच पाहणे महत्वाच ठरणार आहे.


