
Tanker Water Supply : नगर : जिल्ह्यात वाढते तापमान व संभाव्य पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने व्यापक नियोजन करत पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन शाखेमार्फत टंचाईग्रस्त भागांचे सूक्ष्म देखरेख करण्यात येत असून, कोणत्याही नागरिकाला पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये यासाठी यंत्रणा दक्षतेने कार्यरत आहे.
हेही वाचा : कोळगाव येथे भीषण आग; लाखोंचे नुकसान
टँकरद्वारे पाणीपुरवठा
दि. २९ एप्रिल २०२६ रोजीच्या अहवालानुसार जिल्ह्यातील एकूण ३४ गावे व १६२ वाड्या-वस्त्यांमध्ये पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली असून सुमारे ६४ हजार ५८६ नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या भागांसाठी एकूण ३० टँकर (४ शासकीय व २६ खासगी) कार्यरत असून संगमनेर, पारनेर व नगर या तालुक्यांमध्ये टंचाईचे प्रमाण अधिक असल्याने तेथे अनुक्रमे १०, १३ व ६ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. टँकरच्या खेपांबाबतही समाधानकारक प्रगती नोंदविण्यात आली आहे. मंजूर ९०.९२ खेपांपैकी ८८ खेपा पूर्ण करण्यात आल्या असून हे प्रमाण सुमारे ९६.७९ टक्के आहे. यामुळे टंचाईग्रस्त भागांमध्ये पाणी वेळेत पोहोचत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
नक्की पहा : अहिल्यानगरच्या रंगभूमीवर ‘ॲनिमल’चा थरार; सिद्धार्थ जाधवचा अभिनय पाहण्याची संधी
प्रशासन सज्ज (Tanker Water Supply)
पाणीटंचाईवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यातील १२ विहिरी व बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आले असून त्यापैकी ३ जलस्त्रोत थेट गावांसाठी तर ९ टँकर भरण्यासाठी वापरण्यात येत आहेत. आवश्यकतेनुसार अतिरिक्त खाजगी जलस्त्रोत अधिग्रहित करण्याचे अधिकार संबंधित तहसीलदारांना देण्यात आले आहेत. संभाव्य टंचाईग्रस्त गावांसाठी आगाऊ कृती आराखडा तयार करण्यात आला असून टँकर प्रस्तावांना तात्काळ मंजुरी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. टँकरद्वारे पाणीपुरवठा करताना गळती किंवा पाण्याची चोरी होऊ नये यासाठी विशेष भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना पाण्याचा काटकसरीने व जबाबदारीने वापर करण्याचे आवाहन केले असून, पाणीपुरवठा व्यवस्थापनासाठी प्रशासन पूर्ण क्षमतेने कार्यरत असल्याचे स्पष्ट केले आहे.


