Talathi Bharati : तलाठी भरतीची परीक्षा आता MPSC घेणार, जाहिरात कधी निघणार?

0
Talathi Bharati : तलाठी भरतीची परीक्षा आता MPSC घेणार, जाहिरात कधी निघणार?
Talathi Bharati : तलाठी भरतीची परीक्षा आता MPSC घेणार, जाहिरात कधी निघणार?

नगर : दरवर्षी लाखो तरुण हे सरकारी नोकरीचे स्वप्न पाहत अभ्यास करत असतात म्हणूनच महाराष्ट्रातील लाखो तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आणि कामाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या युवकांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. लवकरच महसूल विभागातील तलाठी पदांची भरती (Talathi Bharati) प्रक्रिया पार पडणार आहे. विशेष बाब म्हणजे ही भरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC मार्फत होणार आहे. यामुळे पूर्वीच्या गोंधळ आणि गैरप्रकारांना पूर्णविराम मिळणार आहे.

नक्की वाचा : शिर्डीत २०० रुपयांचा गजरा विकला २ हजाराला, श्रद्धेच्या नावाखाली भाविकांची लूट ; नेमकं काय घडलं?

१७०० पेक्षा जास्त तलाठी पदांची भरती (Talathi Bharati)

गेल्या काही वर्षांपासून तलाठी भरती प्रक्रिया वादात सापडली होती. अनेक तांत्रिक अडचणी आणि अनियमितता समोर आल्याने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जोरदार मागणी केली होती की, ही परीक्षा MPSC कडे सोपवावी. विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करत आता सरकारने ही जबाबदारी MPSC ला दिली आहे. यामुळे परीक्षेचा दर्जा उंचावेल आणि फक्त गुणवत्तेवर आधारित निवड होईल, अशी आशा निर्माण झाली आहे. आता महसूल विभागामार्फत तब्बल १७०० पेक्षा जास्त तलाठी पदांची ही भरती होणार आहे. रिक्त जागांचा अहवाल ८ मे पर्यंत सादर करावा लागणार आहे.

अवश्य वाचा: राहात्यातील बेकायदा गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश; श्रीरामपुरातील डॉक्टरसह दोघे गजाआड

जुलै २०२६ मध्ये महाभरतीची जाहिरात येणार (Talathi Bharati)

तलाठी भरती प्रक्रियेला वेग देण्यासाठी सरकारने प्रशासनाला कडक सूचना दिल्या आहेत. राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांना आपल्या विभागातील जिल्हानिहाय रिक्त तलाठी पदे आणि आरक्षण तपासून ८ मेपर्यंत शासनाकडे अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यानंतर प्रक्रिया वेगाने पुढे जाईल. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सर्व विभागीय आयुक्तांना अहवाल दिल्यानंतर महसूल विभाग जाहिरात प्रसिद्ध करेल. सर्व काही ठरल्याप्रमाणे झाल्यास जुलै २०२६ मध्ये ही महाभरतीची जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे. यापूर्वी २०२३ मध्ये तलाठी भरती घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी साडेअकरा लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते. 

भरतीची काही मुख्य वैशिष्ट्ये सुद्धा आहेत. एकूण रिक्त पदे १७०० पेक्षा जास्त आहेत. PESA आणि बिगर PESA क्षेत्रासाठी स्वतंत्र जागांचे वर्गीकरण करण्यात येणार आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता सांगायची झाली तर कोणत्याही शाखेतील पदवीधर या परीक्षेसाठी अर्ज करू शकतील. निवड प्रक्रिया अगदीच सोपी आहे. MPSC मार्फत लिखित परीक्षा आणि इतर टप्पे पार पडतील.

तलाठी हे पद ग्रामीण भागातील प्रशासनाचा मुख्य आधारस्तंभ मानले जाते. गावातील महसूल कामे, जमिनीचे रेकॉर्ड, कर वसुली आदी जबाबदाऱ्या तलाठयाकडे असतात. समाजात या पदाला विशेष प्रतिष्ठा आहे. त्यामुळे या भरतीसाठी प्रचंड स्पर्धा असते. MPSC सारख्या विश्वासार्ह संस्थेमार्फत परीक्षा होणार असल्याने उमेदवारांना आता अधिक मेहनत आणि स्मार्ट अभ्यास करावा लागणार आहे.