Police parade: नगरसेवकांच्या विशेष सभेच्या पार्श्वभूमीवर कर्जत शहरातून पोलिसांचे पथसंचलन

सव्वा चार वर्षात कर्जत नगरपंचायतीच्या राजकारणात अनेक चढ-उतार

0

Police parade: कर्जत: कर्जत नगरपंचायतीच्या राजकारणात पुन्हा एकदा पदाधिकाऱ्यांच्या अंतर्गत वाद उफाळला असून गटनेता बदलानंतर आता कर्जतच्या नगराध्यक्षा रोहिणी घुलेंवर अविश्वास प्रस्ताव १३ नगरसेवकांनी दाखल केला. त्यावर जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांनी बुधवारी (ता.१३) सर्व नगरसेवकांची विशेष सभा आयोजित केली असून या काळात कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी कर्जतचे पोलीस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत शहरातून पोलीस विभागाने पथसंचलन (Police parade) पार पाडले. बुधवारच्या विशेष सभेकडे कर्जतकरांचे लक्ष लागले आहे.

अवश्य वाचा- लाडक्या बहिणी प्रतीक्षेत; कधी मिळणार योजनेचे पैसे?

सव्वा चार वर्षात कर्जत नगरपंचायतीच्या राजकारणात अनेक चढ-उतार (Police parade)

कर्जत नगरपंचायतीमध्ये एकाच गटातील नगरसेवकांत अधिकारा आणि पदाधिकारी बदलामुळे अंतर्गत वाद उफाळला आहे. गुरुवारी (ता.७ मे) गटनेता बदलात उपगटनेत्यासह ११ नगरसेवकांनी गडांतर आणल्यानंतर त्याच दिवशी कर्जतच्या विद्यमान नगराध्यक्षा रोहिणी घुलेंवर देखील अविश्वास प्रस्ताव जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांच्याकडे दाखल करण्यात आला. त्या प्रस्तावाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी बुधवारी (ता.१३ मे) कर्जत येथे नगरपंचायतीच्या सभागृहात सकाळी ११ वाजता विशेष सभा आयोजित केली असून यासाठी पीठासीन अधिकारी म्हणून कर्जतचे प्रांताधिकारी नितीन पाटील यांची नियुक्ती केली आहे. सव्वा चार वर्षात कर्जत नगरपंचायतीच्या राजकारणात अनेक चढ-उतार व राजकीय अस्थिरता पहावयास मिळाल्याने मंगळवारी कर्जतचे पोलीस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे यांनी शहराची कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कर्जत पोलीस विभाग दक्ष आहे या करीता कर्जत पोलिसांचे शहरातून पथसंचलन पार पाडले. कर्जत पोलीस ठाण्यापासून पथसंचलनास सुरुवात होत म्हसोबा गेट, कापरेवाडी वेस, बाजारतळ, मराठी शाळा मुख्य रस्त्यावर येत बसस्थानक परिसरातून शेवट दादा पाटील महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ करण्यात आला. या संचलनात शीघ्र कृती दलाची एक तुकडी यासह कर्जत पोलीस उपविभाग आणि कर्जत पोलीस दल सहभागी झाले होते.