Theft : नगर : संगमनेर तालुक्यातील चिंचपूर-दुर्गापूर शिवारात काल (ता. १२) दुपारी ४ वाजेच्या सुमारास चोरीची घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून एका महिलेला मारहाण करत कपाटातील १० हजारांची रोकड चोरून नेली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.
हेही वाचा : मढी शिवारात आढळलेल्या अनोळखी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे आवाहन
जीवे मारण्याची धमकी
चिंचपूर-दुर्गापूर शिवारात रवींद्र संपत थेटे यांच्या वस्तीशेजारी गणपत देवराम पारधे यांचे निवासस्थान आहे. काल दुपारी पारधे कुटुंबातील बहुतांश सदस्य काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. घरात केवळ त्यांची लहान सून आणि एक छोटे बाळ होते. हीच संधी साधून दोन पुरुष आणि दोन महिला, अशा एकूण चार चोरट्यांनी घरात प्रवेश केला. या चोरट्यांनी घरातील सुनेला मारहाण केली आणि तिला जीवे मारण्याची धमकी देऊन दहशत निर्माण केली. त्यानंतर घराची उचकापाचक करून कपाटात ठेवलेले १० हजार रुपये रोख लंपास केले.
नक्की पहा : ओबीसींना सवतीच्या लेकराची वागणूक का?; लक्ष्मण हाके यांचा फडणवीसांना सवाल
श्वान पथकाला पाचारण (Theft)
सदर घटनेची माहिती मिळताच शिर्डी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. त्यांच्यासोबत लोणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वाघ आणि आश्वी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरसाठ हे आपल्या पथकासह दाखल झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून तपासासाठी तातडीने श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे. प्राथमिक तपासात १० हजार रुपये चोरीला गेल्याची माहिती समोर आली असली तरी, पोलीस अधिक सखोल चौकशी करत आहेत. याप्रकरणी लोणी आणि आश्वी पोलीस संयुक्तपणे तपास करत असून लवकरच आरोपींना जेरबंद केले जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.



