नगर : जागतिक बाजारपेठेतील वेगाने बदलणाऱ्या घडामोडींमुळे भारतीय रुपयाची होणारी घसरण Indian Rupee Fall) थांबण्याचे नाव घेत नाही. अमेरिकन डॉलरच्या (American Dollar) तुलनेत रुपया आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर म्हणजेच प्रति डॉलर ९६.३३ च्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. चलन घसरल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि सर्वसामान्यांच्या बजेटवर त्याचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच सलग पाचव्या सत्रात रुपयाने नवा तळ गाठल्याने आर्थिक क्षेत्रात चिंता वाढली आहे.
आता रुपयाच्या या घसरणीची मुख्य कारणे आणि त्याचे परिणाम काय? ते जाणून घेऊ…
नक्की वाचा: हार्दिक पांड्या दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधणार; सत्य नेमकं काय?
रुपया घसरण्याची ३ मुख्य कारणे
कच्च्या तेलाच्या किमतीत भडका – इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल १०७ डॉलरच्या पुढे गेला आहे. भारत आपली ८५ टक्क्यांहून अधिक तेलाची गरज आयातीद्वारे पूर्ण करतो. तेल महाग झाल्याने भारताला डॉलरमध्ये जास्त पैसे मोजावे लागत आहेत, ज्यामुळे रुपया कमजोर होत आहे. तसेच भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा कच्चे तेल आयात करणारा देश आहे. देशातील जवळपास ८८ टक्के तेल आयातीवर अवलंबून असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलदर वाढले की, त्याचा थेट परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर आणि रुपयावर दिसून येतो.
अवश्य वाचा: आता वाहनधारकांची खैर नाही! ‘ही’ गोष्ट न केल्यास थेट हजार रुपये दंड, परिवहन मंत्र्यांचा इशारा
मजबूत झालेला अमेरिकन डॉलर: अमेरिकेतील मजबूत आर्थिक आकडेवारीमुळे अमेरिकन मध्यवर्ती बँक व्याजदरात मोठी कपात करण्याची शक्यता कमी झाली आहे. परिणामी, डॉलरचा इंडेक्स वधारून ९९.०५ वर पोहोचला आहे. जागतिक अनिश्चिततेच्या काळात सुरक्षित गुंतवणूक म्हणून जगभरातील गुंतवणूकदार डॉलरला पसंती देत आहेत. त्यामुळे रुपयाचं मूल्य घसरत आहे.
परदेशी गुंतवणूकदारांची माघार – जागतिक पातळीवरील अस्थिरतेमुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून आपले पैसे काढून घेण्यास सुरुवात केली आहे. देशातून डॉलर बाहेर जात असल्यामुळे रुपयावरील दबाव सातत्याने वाढत आहे. त्यामुळे सुद्धा रुपयाचं मूल्य घसरले आहे.
इराण युद्धानंतर रुपया सुमारे ५.५ टक्क्यांनी घसरला असून आशियातील सर्वात कमजोर चलनांपैकी एक ठरला आहे. चालू वर्षात रुपयात तब्बल ७टक्क्यांची घसरण झाल्याची माहिती समोर आली आहे.
रुपयाच्या घसरणीचा सर्वसामान्यांवर आणि देशावर काय परिणाम होणार

परदेशातील शिक्षण आणि प्रवास महागणार: जे विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी जात आहेत किंवा जे नागरिक परदेश दौऱ्याचे नियोजन करत आहेत, त्यांचा खर्च वाढणार आहे. कारण आता पूर्वीच्या तुलनेत डॉलर खरेदी करण्यासाठी अधिक भारतीय रुपये मोजावे लागणार आहेत.
महागाईत होणार वाढ: रुपया कमजोर झाल्यामुळे परदेशातून आयात केल्या जाणाऱ्या वस्तू महाग होतात. कच्च्या तेलाचे दर वाढल्याने देशात नुकतीच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर ३ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. इंधन महागल्याने वाहतूक खर्च वाढेल आणि पर्यायाने भाजीपाल्यापासून ते जीवनावश्यक वस्तूंपर्यंत सर्व काही महाग होऊ शकते.
इलेक्ट्रॉनिक्स आणि गाड्या महागणार: भारतात मोठ्या प्रमाणावर लागणारे मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे सुटे भाग आणि कच्चा माल परदेशातून येतो. डॉलर महागल्यामुळे कंपन्यांचा उत्पादन खर्च वाढेल, ज्यामुळे ग्राहकांसाठी या वस्तू खरेदी करणे अधिक खर्चिक होणार आहे.



