Police Raid : शेवगाव : पोलीस स्टेशन हद्दीतील सालवडगाव शिवारात अवैधरित्या सुरू असलेल्या मावा निर्मिती कारखान्यावर शेवगाव पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल 31 लाख 38 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी आणखी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या अवैध धंद्यांविरोधातील कठोर कारवाईच्या आदेशानुसार ही मोहीम राबविण्यात आली.
हेही वाचा : उपजिल्हा रुग्णालयातील अधीक्षकांच्या बदलीची मागणी; आरोग्यमंत्र्यांकडे तक्रार
महत्वाचा मुद्देमाल जप्त
पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना 20 मे 2026 रोजी रात्री सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास गोपनीय माहिती मिळाली की, सालवडगाव परिसरात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा वापर करून मशीनच्या सहाय्याने मावा तयार केला जात आहे. माहितीची खातरजमा झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास पथक व पंचांसह सालवडगाव शिवारात छापा टाकला. यावेळी घटनास्थळी इम्रान निसार शेख (वय 22) व सोहेल अफ्सर शेख (वय 21, दोघे रा. सालवडगाव, ता. शेवगाव) हे आढळून आले.
नक्की पहा : ‘हे’ 4 युवा खेळाडू ठरणार टीम इंडियाचे भविष्य?
दोघांवर गुन्हा दाखल (Police Raid)
चौकशीदरम्यान ताब्यातील आरोपींनी हा माल मुज्जीप मुस्सा शेख व परवेज मुस्सा शेख (रा. शेवगाव) यांचा असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार संबंधितांविरुद्ध शेवगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 427/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 123, 223, 274, 275 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे व उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बाजीराव सानप हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.



