Bail Rejected : भोंदू राजेंद्र गडगेची न्यायालयीन कोठडी कायम; गडगेची मुलगी व इतर दोघांचे अटकपूर्व जामिन फेटाळले

अनेकांना भूलथापा देत त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळल्याचा आरोप

0
Bail Rejected : भोंदू राजेंद्र गडगेची न्यायालयीन कोठडी कायम; गडगेची मुलगी व इतर दोघांचे अटकपूर्व जामिन फेटाळले
Bail Rejected : भोंदू राजेंद्र गडगेची न्यायालयीन कोठडी कायम; गडगेची मुलगी व इतर दोघांचे अटकपूर्व जामिन फेटाळले

Bail Rejected : संगमनेर : अंधश्रद्धेच्या माध्यमातून लोकांकडून पैसे उकळल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील कथित भोंदू बाबा (The Fraudulent Guru) राजेंद्र गडगे आणि त्याचा सहकारी मधुकर शिंदे यांची न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) कायम ठेवण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणातील पसार असलेल्या तिघा आरोपींनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज (Bail Rejected) गुरुवारी (ता. २१) जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळून लावला असल्याची माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव ॲड. रंजना पगार-गवांदे यांनी दिली.

नक्की वाचा : पाथर्डीत केमिकल’युक्त’ फळ विक्रेत्यांवर प्रशासनाचा छापा; अनेकांनी दुकाने सोडून काढला पळ

तिघे अद्याप पसार

या प्रकरणात राजेंद्र गडगे, डॉ. मोहन पुरी, ज्ञानेश्वरी गडगे (रा. वडगाव पान, ता. संगमनेर) तसेच सूरज शिंदे व मधुकर शिंदे (रा. रहिमपूर, ता. संगमनेर) या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी गडगे आणि मधुकर शिंदे हे सध्या न्यायालयीन कोठडीत असून डॉ. मोहन पुरी, ज्ञानेश्वरी गडगे आणि सूरज शिंदे हे तिघे अद्याप पसार आहेत.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

मोठ्या प्रमाणात पैसे उकळल्याचा आरोप (Bail Rejected)

तक्रारदार ॲड. रंजना पगार-गवांदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजेंद्र गडगे हा “दैवी शक्ती” आणि “मंत्रतंत्र” यांच्या नावाखाली कॅन्सरसारखे दुर्धर आजार बरे करण्याचे दावे करत होता. तसेच अपत्यप्राप्ती, घरातील अडचणी दूर करणे, मानसिक व कौटुंबिक समस्या सोडवणे अशा विविध कारणांवरून अनेकांना भूलथापा देत त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळल्याचा आरोप आहे. या सर्व प्रकारातून अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत नागरिकांची आर्थिक व मानसिक फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे.

तपास यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित

या संपूर्ण प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून डॉ. मोहन पुरी याचे नाव समोर येत असून, बनावट औषधांचा पुरवठा आणि भोंदूगिरीच्या जाळ्यामागे त्याची महत्त्वाची भूमिका असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांच्या तपासात डॉ. पुरी हा केवळ राजेंद्र गडगेलाच नव्हे, तर राज्यातील इतरही अनेक भोंदू बाबांना अशाच प्रकारची औषधे पुरवत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.विशेष म्हणजे, नाशिक जिल्ह्यात यापूर्वीच त्याच्याविरोधात चार गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. तरीही तो पोलिसांना चकवा देत अद्याप फरार असल्याने तपास यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. 

हा केवळ फसवणुकीचा नव्हे तर गंभीर सामाजिक गुन्हा

याबाबत ॲड. पगार-गवांदे यांनी नाराजी व्यक्त करत पोलिसांनी तातडीने आरोपींना अटक करून तपास पुढे न्यावा, अशी मागणी केली आहे.“नागरिकांच्या आरोग्याशी, मानसिकतेशी आणि मालमत्तेशी खेळणारे मोहन पुरी, राजेंद्र गडगे आणि त्यांना मदत करणाऱ्या इतर आरोपींना तातडीने अटक होणे अत्यावश्यक आहे. हा केवळ फसवणुकीचा नव्हे तर गंभीर सामाजिक गुन्हा आहे,” असे ॲड. रंजना पगार-गवांदे यांनी म्हटले आहे. दरम्यान, फरार आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आल्याने पोलिसांकडून आता त्यांच्या अटकेसाठी शोधमोहीम अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.