Monsoon Update : मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार? वाचा सविस्तर…

0
Monsoon Update : मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार? वाचा सविस्तर…
Monsoon Update : मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार? वाचा सविस्तर…

नगर : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरातील शहरे व ग्रामीण भाग उष्णतेने अक्षरश: भाजून निघालेली आहेत. जून महिना सुरू व्हायला अवघ्या काही दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. असं असतानाच यावेळी राज्यात मान्सून (Monsoon Update) नेमका कधी येणार,असा प्रश्न सगळ्यांनाच पडला असून सगळेच पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
आता हवामान विभागाने (Meteorological Department) मान्सून कधी येणार याची माहिती दिली आहे.

नक्की वाचा: अहिल्यानगर जिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसाने झोडपले; परिस्थिती काय?

आता सर्वात जास्त मान्सूनची वाट कोणी पाहत असेल तर ते आहेत राज्यातील शेतकरी म्हणजेच आपला बळीराजा. यंदा मोसमी वारे हे नेहमीपेक्षा थोडे लवकर दाखल होणार असल्याने नागरिकांना तीव्र उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे. सध्या मान्सूनची वाटचाल ही अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, कोमोरिन परिसर आणि अंदमानच्या समुद्रातील उर्वरित प्रदेशात सुरु आहे. त्यामुळे पुढील दोन-तीन दिवसात या प्रदेशात मान्सून स्थिरावण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यानंतर मान्सून वेगाने भारतीय किनारपट्टीकडे आगेकूच करेल. राज्यातील काही भागात मान्सून पूर्व पाऊस कोसळत असला तरी उष्णता अजूनही कायम आहे. विदर्भात अजून ही पाऊस झाला नसल्याने नागरिकांना तीव्र उष्णता सहन करावी लागत आहे.

अवश्य वाचा: राघव चड्ढा यांना भाजपने सोपवली मोठी जबाबदारी;अध्यक्षपदी नियुक्ती

२६ मे ला मान्सून केरळमध्ये दाखल होणार (Monsoon Update)

हवामान विभागाने व्यक्त केलेल्या हवामान अंदाजानुसार, २६ मे च्या आसपास मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता जरी असली, तरी चार दिवस मान्सून पुढे- मागे होण्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे मान्सून उद्या दाखल झाला नाही तर पुढील चार दिवसात मान्सूनचे आगमन केरळच्या किनारपट्टीवर होईल असा अंदाज आहे. आज २५ मे रोजी केरळमधील पाथनमथिट्टा, अलाप्पुझा, कोट्टायम, इडुक्की, एर्नाकुलम, त्रिशूर, मलप्पुरम, कोझिकोड आणि वायनाड या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. २६ आणि २७ मे ला, तिरुवनंतपुरम, कोल्लम, अलाप्पुझा आणि एर्नाकुलमसाठी सुद्धा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

१० जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात येणार (Monsoon Update)

सामान्यतः केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर मान्सून वर सरकतो. त्यानंतर तो कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांत प्रवेश करतो. यावर्षी १० जूनपर्यंत महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात आल्यानंतर येत्या १५ जून ला मान्सून मध्य प्रदेश, गुजरातमध्ये पोहोचणार आहे. त्यानंतर राजस्थानमध्ये २५ जून ते ५ जुलैपर्यंत मान्सून पोहोचू शकतो.

यंदा नैऋत्य मान्सून वेळेआधीच केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. दरवेळी १ जूनला पोहोचणारा मान्सून यंदा २६ मे रोजीच केरळच्या किनारपट्टीवर धडकू शकतो. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र अधिक सक्रिय झाल्याने मान्सूनचा वेग हा सध्या वाढला आहे. विशेष म्हणजे, यंदा मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यात बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात कोणतेही चक्रीवादळ निर्माण झालेले नाही. त्यामुळे मान्सूनच्या प्रवासात कोणताही मोठा अडथळा येणार नसून तो सुरळीत पुढे सरकणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मान्सूनचा प्रवास असाच सुसाट राहिल्यास ५ जूनला मान्सून गोव्यात दाखल होण्याची शक्यता आहे. तर ६ जूनला कोकणात आणि ७ जूनला पुण्यात मान्सूनचे आगमन होऊ शकते.त्यामुळे आता मान्सून बाबत हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज नेमका कितपत योग्य ठरणार आणि आपल्या बळीराजाला नेमका कधी दिलासा मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.