Firing on the Police : पाथर्डी : जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर पिस्तुलातून गोळीबार (Firing on the Police) करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींच्या साथीदारांना पाथर्डी पोलिसांनी (Pathardi Police) पाठलाग करून जेरबंद केले आहे. या कारवाईत तीन आरोपींना अटक (Accused arrested) करण्यात आली असून दोन आरोपी अद्याप पसार आहेत.
नक्की वाचा : महायुती सरकारच्या फसव्या कर्जमाफीविरोधात पारनेरमध्ये सर्वपक्षीयांची वज्रमूठ
पोलिसांना पाहून आरोपीने घेतली आक्रमक भूमिका
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अक्कलकोट पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी मेहेर कचरू गायकवाड याला पकडण्यासाठी ४ जून रोजी स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीणचे पथक पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथे आले होते. पाथर्डी पोलिसांच्या मदतीने आरोपीच्या घरासमोर पोलीस पथक पोहोचले असता आरोपीने पोलिसांना पाहून आक्रमक भूमिका घेतली. पोलिसांनी त्याला शरण येऊन तपासात सहकार्य करण्याचे आवाहन केले; मात्र त्याने जवळील अग्निशस्त्रातून पोलीस शिपाई आसाराम बटुळे यांच्यावर गोळी झाडली. सुदैवाने ही गोळी त्यांच्या जवळून गेल्याने अनर्थ टळला.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
गोळीबारानंतर आरोपीचे घटनास्थळावरून पलायन (Firing on the Police)
गोळीबारानंतर आरोपीने आपल्या साथीदारांसह चारचाकी वाहनातून घटनास्थळावरून पलायन केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक विजय शिंदे (स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण) यांच्या फिर्यादीवरून आरोपी मेहेर गायकवाड व त्याच्या साथीदारांविरुद्ध पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पाथर्डी पोलिसांनी पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन विशेष पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला.
सापळा रचून आरोपी ताब्यात
दरम्यान, ९ जून रोजी पहाटे आरोपी खरवंडी परिसरात आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांना पाहताच आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यांचा पाठलाग करून तिघांना ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सुदाम बबन राठोड (वय २५, दुर्गानगर तांडा), कृष्णा बाळू पवळे (वय २४, खरवंडी) आणि इब्राहिम महंमद सय्यद (वय १९, खरवंडी) यांचा समावेश आहे. चौकशीदरम्यान त्यांनी आणखी दोन साथीदारांसह गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
न्यायालयाने ११ जूनपर्यंत सुनावली पोलीस कोठडी
तिघा आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना ११ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यातील अन्य दोन फरार आरोपींचा शोध सुरू असून पोलीस उपनिरीक्षक विशाल लहाने पुढील तपास करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास पुजारी, पोलीस उपनिरीक्षक विशाल लहाने, संदीप ढाकणे तसेच पाथर्डी पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.



