Rasta Roko Movement : खरवंडी कासार बंद; वाढत्या चोऱ्यांविरोधात नागरिकांचा रास्ता रोको

तालुक्यातील वाढत्या गुन्हेगारीबाबत चिंता व्यक्त

0
Rasta Roko Movement : खरवंडी कासार बंद; वाढत्या चोऱ्यांविरोधात नागरिकांचा रास्ता रोको
Rasta Roko Movement : खरवंडी कासार बंद; वाढत्या चोऱ्यांविरोधात नागरिकांचा रास्ता रोको

Rasta Roko Movement : पाथर्डी : तालुक्यातील खरवंडी कासार परिसरात अलीकडे घडलेल्या सशस्त्र दरोड्यांच्या घटनांसह वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. गुन्हेगारीला आळा घालावा, चोरीच्या (Theft) घटनांचा तातडीने तपास लावावा आणि पोलीस यंत्रणा अधिक सक्षम करावी, या मागण्यांसाठी शुक्रवारी (ता. १२) खरवंडी कासार बाजारपेठ (Kharvandi Kasar Market Area) बंद ठेवून नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन (Rasta Roko Movement) केले. गेल्या तीन दिवसांपूर्वी परिसरात दोन ठिकाणी सशस्त्र दरोड्याच्या घटना घडल्या होत्या. तसेच मागील काही महिन्यांत झालेल्या अनेक चोरीच्या घटनांचा अद्याप उलगडा न झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी एकत्र येत आंदोलन छेडले.

नक्की वाचा : तुकाराम मुंढे यांच्या बदलीचा विचार केल्यास संगमनेरकर रस्त्यावर उतरणार; मुख्यमंत्र्यांना निवेदन

तालुक्यातील वाढत्या गुन्हेगारीबाबत चिंता व्यक्त

यावेळी सामाजिक कार्यकर्ते आजिनाथ कीर्तने यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त करताना सांगितले की, परिसरात वारंवार चोरीच्या घटना घडत असून याबाबत अनेकदा निवेदने देण्यात आली आहेत. मात्र प्रशासनाकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याने नागरिकांचा संयम सुटत आहे. मागण्या मान्य न झाल्यास आणखी तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. आम आदमी पक्षाचे किसन आव्हाड यांनी तालुक्यात वाढत्या गुन्हेगारीबाबत चिंता व्यक्त केली. बेपत्ता मुलीच्या प्रकरणाचा तातडीने तपास करावा, खरवंडी कासार येथे स्वतंत्र पोलीस स्टेशन उभारणीसाठी असलेल्या तांत्रिक अडचणी दूर कराव्यात, तसेच पोलीस चौकीतील मनुष्यबळ वाढवून अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली. अन्यथा पाथर्डी येथील नाईक चौकात मोठे जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

पोलिसांचा चोख बंदोबस्त (Rasta Roko Movement)

आंदोलकांनी खरवंडी कासार पोलीस चौकी २४ तास कार्यान्वित ठेवावी, चौकीसाठी दोन पोलीस उपनिरीक्षक व आठ पोलीस कॉन्स्टेबल कायमस्वरूपी उपलब्ध करून द्यावेत, अशी प्रमुख मागणी केली. यासंदर्भातील निवेदन पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव, पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती आगरकर आणि नायब तहसीलदार प्रभाकर शेटेकर यांना देण्यात आले. या आंदोलनात सरपंच सुनील खेडकर, गणेश जवरे, लहू दराडे, विठ्ठल खेडकर, माणिक खेडकर, मल्हारी खेडकर, सुरेश खेडकर, विठ्ठल कीर्तने, प्रल्हाद कीर्तने, संतोष पालवे, रावसाहेब कीर्तने, आप्पा ढाकणे, विशाल खेडकर, मच्छिंद्र कीर्तने, शिवाजी दराडे यांच्यासह परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.