Theft : कोपरगाव : तालुक्यातील सोनेवाडी (Sonewadi) परिसरात शुक्रवारी (ता. १२) मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत तीन ठिकाणी चोरी (Theft) केली आहे. या घटनांमध्ये रोख रक्कम, सोन्याचे दागिने (Gold jewelry) आणि चांदीचा ऐवज लंपास करण्यात आला. सलग घडलेल्या चोरीच्या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नक्की वाचा : अहिल्यानगरचा सुसंस्कृतपणा संपवणाऱ्या विचारांना उखडून फेकणार; सुजय विखे पाटलांचा विरोधकांवर हल्लाबोल
उपाधीक्षक भारती यांची घटनास्थळी भेट
घटनेची माहिती मिळताच कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शिर्डीचे पुढचे उपाध्यक्ष अमोल भारती यांना घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपाधीक्षक भारती यांनीही घटनास्थळी भेट देत तपासाचा आढावा घेतला. यावेळी अहिल्यानगर येथील न्यायवैद्यक पथक व तज्ज्ञांची टीमने घटनास्थळी दाखल होऊन पुरावे संकलित केले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
सुमारे अर्धा तोळे वजनाचे डोरले हिसकावून नेले (Theft)
पहिल्या घटनेत हिराबाई भास्कर माकोने यांच्या वस्तीवर चोरट्यांनी धाड टाकून त्यांच्या गळ्यातील सुमारे अर्धा तोळे वजनाचे डोरले हिसकावून नेले.
त्यानंतर चोरट्यांनी अर्जुन विठ्ठल जावळे यांच्या वस्तीवर मोर्चा वळवला. मात्र घरातील सदस्यांना जाग आल्याने चोरट्यांनी तेथून पाहुण्यांची पर्स चोरून पळ काढला. या पर्समध्ये कविता अर्जुन जावळे यांचे १ हजार ५०० रुपये रोख व सुमारे अर्धा ग्रॅम सोन्याचा ऐवज होता.
चोरटे आल्याची चाहूल लागताच प्रतिकार करण्याचा प्रयत्न
तिसऱ्या घटनेत गोरक्षनाथ रोड परिसरातील अण्णासाहेब आमलुक जावळे यांच्या वस्तीवर चोरट्यांनी प्रवेश केला. त्यावेळी सविता जावळे या घराबाहेरील पोर्चमध्ये झोपलेल्या होत्या. चोरटे आल्याची चाहूल लागताच त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र चार चोरट्यांच्या हातात कुऱ्हाडी असल्याने त्या घाबरल्या. दोन चोरट्यांनी त्यांना कुऱ्हाडीचा धाक दाखवत वेठीस धरले, तर इतरांनी घरात प्रवेश करून सुमारे दोन तोळे सोने व अर्धा किलो चांदीचा ऐवज चोरून नेला.
पायातील जोडवे काढण्याचाही प्रयत्न
यावेळी चोरट्यांनी त्यांच्या पायातील जोडवे काढण्याचाही प्रयत्न केला, मात्र त्यात त्यांना यश आले नाही. तसेच कानातील कुड्या काढून घेतल्या. मात्र कानातील रिंगा नकली असल्याचे समजून त्यांनी त्या तशाच सोडून दिल्याने अंदाजे तीन ते चार ग्रॅम सोने वाचले.सोनेवाडी येथे आखाडी उत्सव सुरू असल्याने रात्री उशिरा किशोर जावळे यांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ पोलीस पाटील दगू गुडघे यांना कळविले. त्यानंतर पोलीस पाटलांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला आणि पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
विशेष म्हणजे, गेल्याच आठवड्यात विठ्ठल गंगाधर जावळे यांच्या वस्तीवरही अशाच प्रकारची चोरी झाली होती. त्या घटनेत सुमारे दीड तोळे सोने चोरट्यांनी लंपास केले होते.सलग घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे सोनेवाडी परिसरातील वस्तीवर राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास तालुका पोलीस करीत आहे.



