Life-threatening Attack : पारनेर : तालुक्यातील शहांजापूर येथील माऊलीकृपा गोशाळेचे संचालक तथा नितीन महाराज शिंदे यांच्यावर शनिवारी (ता. १३) पहाटे अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे (Life-threatening attack) परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात शिंदे महाराज गंभीर जखमी (Seriously injured) झाले असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथील शासकीय रुग्णालयात (Government Hospital) उपचार सुरू आहेत. पहाटे तीन ते पाच वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.
नक्की वाचा : कुऱ्हाडीचा धाक दाखवत चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी
हल्ला पूर्वनियोजित असल्याचा आरोप
गेल्या बारा वर्षांपासून शहाजापूर येथील माऊलीकृपा गोशाळा तसेच श्री क्षेत्र कौडेश्वर मंदिर परिसरात गोरक्षण आणि गोसेवेचे कार्य करणारे नितीन महाराज शिंदे हे परिसरात परिचित व्यक्तिमत्त्व आहेत. उपचारादरम्यान माध्यमांशी बोलताना त्यांनी हल्ला पूर्वनियोजित असल्याचा आरोप केला. आपल्याला जिवे मारण्याचा अथवा कायमस्वरूपी अपंग करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शिंदे महाराज यांच्या म्हणण्यानुसार, पहाटे गोशाळेच्या मागील बाजूस कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज आल्याने ते पाहणीसाठी गेले असता चार ते पाच अज्ञात हल्लेखोर दबा धरून बसलेले होते. त्यांनी चेहरे कापडाने झाकले होते. आपण तेथे पोहोचताच हल्लेखोरांनी तोंड दाबून मारहाण करण्यास सुरुवात केली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
चेहऱ्यावर चाकूने वार करण्याचा प्रयत्न (Life-threatening Attack)
धारदार शस्त्रे आणि रॉडच्या साहाय्याने हल्ला करण्यात आला. चेहऱ्यावर चाकूने वार करण्याचा प्रयत्न झाल्याने प्रतिकार करताना हातावर जखम झाल्याचे त्यांनी सांगितले. हल्लेखोरांनी डोंगराच्या उताराकडे फरफटत नेत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच दगडांवर आपटून गंभीर दुखापत करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही शिंदे यांनी केला. या मारहाणीत कंबर आणि शरीराच्या विविध भागांना गंभीर दुखापत झाली असून सध्या पायात मुंग्या येत असल्याचे त्यांनी सांगितले. हल्लेखोरांच्या तावडीतून कसाबसा सुटून आपण डोंगरातील दरीमध्ये लपल्याचे शिंदे महाराज यांनी सांगितले. गंभीर मार लागल्याने तेथेच ते काही काळ बेशुद्ध अवस्थेत पडून राहिले. झटापटीदरम्यान मोबाईल हरवल्याने कोणाशी संपर्क साधता आला नाही.
काही समाजविघातक घटकांकडून यापूर्वीही त्रास
सकाळी गोशाळेचे कर्मचारी आल्यानंतर त्यांनी शोध घेऊन त्यांना वर आणले आणि उपचारासाठी दाखल केले. आपण हिंदुत्ववादी आणि वारकरी संप्रदायाचे कार्य करत असल्यामुळे काही समाजविघातक घटकांकडून पूर्वीही त्रास दिला गेला असल्याचा दावा शिंदे यांनी केला. यापूर्वीही गोशाळेशी संबंधित काही घटना घडल्या असून त्याबाबत पोलीस प्रशासनाकडे तक्रारी केल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनावर विश्वास असून या प्रकरणात न्याय मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, ही घटना नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून नगर तालुका पोलिसांसह सुपा पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. विभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांनीही घटनास्थळी भेट देत तपासाबाबत आवश्यक सूचना दिल्या आहेत.
शिंदे महाराजांवर झालेला हल्ला पोलिसांसाठी चिंतेचा विषय
हल्ल्यामागील नेमके कारण, हल्लेखोरांची ओळख आणि त्यांचे उद्दिष्ट याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे.विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी शहाजापूर डोंगरालगत असलेल्या हजरत शहारबशहा दर्ग्याची अज्ञातांनी तोडफोड केली होती. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या या स्थळावरील घटनेनंतर शिंदे महाराजांवर झालेला हल्ला पोलिसांसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. या दोन्ही घटनांमध्ये काही संबंध आहे का, याचाही तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.



