iPhone thief | नगर : सध्या तरुणाईत आयफोनची (iPhone) क्रेझ वाढली आहे. सोशल मीडियावर रिल बनविण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यासाठी महागडे फोन खरेदी करण्याचा कल तरुणाईत दिसून येत आहे. या महागड्या फोनसाठी पैसे मिळविण्यासाठी काही तरुण कोणत्याही थराला जाताना दिसून येत आहेत. असाच काहीसा प्रकार अहिल्यानगर शहरात घडला. पठ्ठ्याने चक्क आयफोन मिळविण्यासाठी आश्रमातील दानपेटीवरच डल्ला मारला. पोलिसांनी तपास करत त्याला तुरुंगाचे दर्शन घडवलं.
हे वाचा – कुऱ्हाडीचा धाक दाखवत चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी

दानपेटीतील सर्व पैसे लंपास (iPhone)
अहिल्यानगर शहरातील मिस्कीन मळा परिसरात कृपाल आश्रमातील दानपेटी फोडली गेल्याची फिर्याद सुनील बजाज यांनी ७ जूनला तोफखाना पोलीस ठाण्यात दिली होती. त्या फिर्यादीत म्हटले आहे की, ५ जून रोजी रात्री ११ वाजता सुनील बजाज यांनी लाकडी दानपेटीचे कुलूप उघडले. त्यातील पैसे मोजले. त्यात १७ हजार ३०० रुपये होते. ते पैसे त्यांनी मोजून पुन्हा दानपेटीतच ठेवून दानपेटीला कुलूप लावले. दुसऱ्या दिवशी म्हणजे ६ जूनला पहाटे पाच वाजता ते कृपाल आश्रमात गेले. त्यावेळी त्यांच्या आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वाराचा कडीकोयंडा तुटलेला आढळून आला. त्यांनी आश्रमात जाऊन पाहिले तर दानपेटीचे कुलूप व कडीकोयंडा तुटलेला दिसून आला. दानपेटीतील सर्व पैसे लंपास झालेले दिसून आले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

सेकंड हँड आयफोन विकत घेण्यासाठी चोरी (iPhone)
या बाबत तोफखाना पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर व पथकाने आश्रमाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्या आधारे विजय सुनील चालल (वय २५, रा. श्रीराम चौक, पाईपलाईन रस्ता, अहिल्यानगर) या संशयित आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे पथकाने कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. सेकंड हँड आयफोन विकत घेण्यासाठी त्याने ही चोरी केल्याचे पथकाला सांगितले. पथकाने त्याच्याकडून सेकंड हँड आयफोन हस्तगत केला आहे.



