Local Crime Branch : नगर : स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) प्रभारीपदी शेवगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे (Santosh Mutkule) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन (Superintendent of Police Mummaka Sudarshan) यांनी सोमवारी (ता.१५) याबाबत आदेश जारी केले. एलसीबीचे प्रभारी पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांची गेल्या गुरूवारी बदली झाल्यानंतर या पदावर कोणाची नियुक्ती होणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते.
किरण कबाडी यांची एलसीबीच्या प्रभारीपदावरून अवघ्या ११ महिन्यांत बदली करण्यात आली होती. त्यांच्या बदलीनंतर सहायक पोलीस निरीक्षक हरीष भोये यांच्याकडे तात्पुरता पदभार देण्यात आला होता. मात्र एलसीबीच्या कायमस्वरूपी नेतृत्वाबाबत सुरू असलेल्या चर्चाना सोमवारी पूर्णविराम मिळाला.
मुटकुळे यांना जिल्ह्यातील कामकाजाचा चांगला अनुभव
संतोष मुटकुळे यांना जिल्ह्यातील पोलीस कामकाजाचा चांगला अनुभव आहे. त्यांनी यापूर्वी पाथर्डी पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणून दोन वर्षे काम केले असून गेल्या वर्षभरापासून ते शेवगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी होते. त्याआधी त्यांनी ठाणे शहर, नवी मुंबई, नाशिक आणि चंद्रपूर येथे विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. पाथर्डी आणि शेवगाव येथील त्यांच्या कामगिरीची दखल घेत पोलीस अधीक्षक सुदर्शन यांनी त्यांच्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धुरा सोपविली आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
हा बदल जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाचा (Local Crime Branch)
एलसीबीच्या नेतृत्वात झालेला हा बदल जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्था व्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. गेल्या काही काळात स्थानिक गुन्हे शाखेचा प्रभाव कमी झाल्याची चर्चा होत होती. जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविणे, फरार आरोपींविरोधात प्रभावी कारवाई करणे, तसेच एलसीबीकडे प्रलंबित असलेल्या विविध गंभीर गुन्ह्यांच्या तपासाला गती देणे, अशी अनेक आव्हाने मुटकुळे यांच्यासमोर असणार आहेत. जिल्ह्यातील गुन्हेगारीवर प्रभावी अंकुश ठेवत स्थानिक गुन्हे शाखेचा पूर्वीचा दरारा पुन्हा निर्माण करण्याची जबाबदारी आता नव्या नेतृत्वावर असणार असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे.
नव्याने जिल्ह्यात रूजू झालेले पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांची श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी असलेले पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांची अकोले पोलीस ठाण्याच्या प्रभारीपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्याकडे कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच अकोले पोलीस ठाण्याचे प्रभारी मोहन बोरसे यांची शेवगाव पोलीस ठाण्याच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली असून नव्याने जिल्ह्यात दाखल झालेले पोलीस निरीक्षक उध्दव डमाळे यांना कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.



