
Financial Assistance : नगर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील तसेच अमृतच्या लक्षित गटातील उमेदवारांसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा (मुख्य) परीक्षा आणि मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी प्रोत्साहनात्मक अर्थसाहाय्य योजना राबविण्यात येत आहे. सन २०२६ मधील केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा (पूर्व) परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पात्र उमेदवारांकडून या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र उमेदवारांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित मुदतीत अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी केले आहे.
हेही वाचा : ८०० सहायक करणार यंदा ई-पीक पाहणी; सातबारा उताऱ्यावरील नोंदी होणार सुलभ
इतके अर्थसाहाय्य मिळणार
या योजनेअंतर्गत पात्र उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी ५० हजार रुपये तसेच मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी २५ हजार रुपये इतके प्रोत्साहनात्मक अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे. अमृतच्या लक्षित गटामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी, मारवाडी, पाटील, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, वैश्य, नायर, नायडू, कम्मा, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुंथर, गुजराती, जाट, हिंदू नेपाळी, भूमिहार, लोहाणा, कानबी आदी समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील उमेदवारांचा समावेश आहे.
नक्की पहा : महापौर ज्योती गाडे यांनी जॉगिंग ट्रॅकच्या संरक्षण भिंतीची केली पाहणी
इथे करा अर्ज (Financial Assistance)
इच्छुक उमेदवारांनी mahaamrut.org.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज भरण्यापूर्वी संकेतस्थळावरील सर्व सूचना काळजीपूर्वक वाचून त्यानुसार अर्ज सादर करावा. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १७ जुलै २०२६ आहे. योजनेसंदर्भातील सर्व माहिती व पुढील सूचना केवळ अमृतच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी किंवा ऑनलाइन अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शनासाठी जिल्हा अमृत कार्यालय, शिंगवी ज्वेलर्स शेजारी, प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर येथे संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.


