Parner Cooperative Sugar Factory : पारनेर : तालुक्यातील देवीभोयरे येथील पारनेर सहकारी साखर कारखान्याच्या (Parner Cooperative Sugar Factory) विक्री घोटाळ्यातील दाखल असलेल्या गुन्ह्याचा पुढील तपास आता पारनेर सत्र न्यायालयाच्या (Parner Sessions Court) निगराणीत होणार असल्याचे आदेश पारनेर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश (Judge) मुबीन शेख यांनी सोमवारी (ता. २९) दिले आहेत.
नक्की वाचा : केडगावात तलवार बाळगून दहशत करणारा जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई
दीड वर्षे उलटूनही गुन्ह्याच्या तपासात प्रगती नाही
याबाबत अधिक माहिती अशी की, वर्षभरापूर्वी पारनेर न्यायालयाने देवीभोयरे येथील सहकारी साखर कारखाना विक्रीत घोटाळा केल्याप्रकरणी राज्य सहकारी बँकेचे दोन अधिकारी, क्रांती शुगर कंपनीचे नऊ संचालक, देवीभोयरेचा तत्कालिन तलाठी यांच्यावर गुन्हा दाखल करून पुढील तपासाचे आदेश दिले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर सुमारे दीड वर्षे उलटले तरी गुन्ह्याच्या तपासात कोणतीही प्रगती झाली नाही, यातील आरोपींचे अटकपूर्व जामीन अहमदनगर सत्र न्यायालयाने रद्द केलेले आहेत. तरीहि पोलिसांनी आरोपींना अटक केली नाही.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
सुमारे दिडशे कोटी रुपये किमतीचा गुन्ह्यातील मुद्देमाल गायब (Parner Cooperative Sugar Factory)
गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींनी कारखाना कार्यक्षेत्रावरील सुमारे दिडशे कोटी रुपये किमतीचा गुन्ह्यातील मुद्देमाल गायब केला आहे. तसा पंचनामा पारनेर पोलिसांनी केला आहे, परंतु तो मुद्देमाल अद्याप हस्तगत केला नाही. सरकारी अधिकाऱ्यांच्या ताब्यातील कारखाना विक्रीचे मूळ दप्तर देखील आरोपींनी फेरबदल करण्याचा प्रयत्न केला होता, फिर्याच्या तक्रारीनंतर मुळ दप्तर पारनेर तहसिलदार यांनी जप्त करून रेकॉर्ड रूमला सुरक्षित ठिकाणी ठेवले आहे. फिर्यादी यांनी पोलिसांना बेचाळीस साक्षीदारांची नावे देऊनही त्यांचे जबाब अद्याप नोंदवण्यात आलेले नाहीत.
आतापर्यंत केलेल्या तपासाचा अहवाल देखील मागवला
राजकीय हस्तक्षेपातून गुन्ह्याचे यापूर्वीचे तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांची पारनेरहुन मुदतपूर्व बदली करण्यात आली होती. या सर्व कारणास्तव फिर्यादी असलेल्या कारखाना बचाव समितीने पुन्हा एकदा पारनेर न्यायालयात धाव घेऊन या बाबतची हकीगत न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. पारनेर न्यायालयाने याबाबत गांर्भीयाने दखल घेऊन, या गुन्ह्याचा पुढील तपास न्यायालयाच्या निगराणीत करण्याचे आदेश दिले. न्यायालयाने पारनेर पोलिसांकडून आतापर्यंत केलेल्या तपासाचा अहवाल देखील मागवला आहे.
तसेच यापुढे दर पंधरा दिवसांनी तपासाच्या प्रगतीचा अहवाल पोलिसांना पारनेर न्यायालयात जमा करण्याचे बंधनकारक केले आहे. तसे न केल्यास या न्यायालयाच्या अवमान प्रक्रियेला पारनेर पोलीसांना सामोरे जावे लागेल असा कडक ईशारा पारनेरच्या प्रथमवर्ग न्यायाधीश श्रीमती मुबीन शेख आदेशात दिलेला आहे.याप्रकरणी फिर्यादी असलेल्या कारखाना बचाव समितीची बाजू ॲड रामदास घावटे, ॲड.उन्मेश चौधरी यांनी मांडली.



