SIR : नगर : भारत निवडणूक आयोगाने १ ऑक्टोबर २०२६ हा अर्हता दिनांक निश्चित करून पारनेर विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाची घोषणा केली आहे. या अंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत घरोघरी भेटी देऊन परिगणन अर्जांचे वाटप व संकलन करणार आहेत. या कार्यक्रमात नागरिकांनी सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी केले.
हेही वाचा : ३५ फूट उंच झाडावर लटकलेल्या कावळ्याची थरारक सुटका; अमित गायकवाड यांचे धाडस
यांची नियुक्ती
पारनेर विधानसभा मतदारसंघात एकूण ३ लाख ५८ हजार १६६ मतदार आहेत. त्यापैकी ३ लाख ८ हजार ५८५ मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले असून ४९ हजार ६६७ मतदारांचे मॅपिंग अद्याप बाकी आहे. तसेच ३५ हजार २६२ मतदारांच्या माहितीत त्रुटी आढळल्या आहेत. या पार्श्वभूमीवर विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेसाठी ४ सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, ४२ अतिरिक्त मतदार नोंदणी अधिकारी, ३८ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक व ३६६ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व अधिकाऱ्यांनी पूर्वतयारीचा भाग म्हणून मॅपिंगचे काम पूर्ण केले असून मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षणही देण्यात आले आहे.
नक्की पहा : मामांची भेट घेतली, तनपुरेंना कोणता कानमंत्र दिला?
हरकतींची पडताळणी (SIR)
मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून प्राप्त होणाऱ्या परिगणन अर्जांच्या आधारे ५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येतील. याच कालावधीत मॅपिंग न झालेल्या अथवा चुकीचे मॅपिंग झालेल्या, मात्र अर्ज प्राप्त झालेल्या मतदारांच्या सुनावण्या घेऊन पडताळणी करण्यात येईल. ५ ऑगस्ट ते ३ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत सुनावणीदरम्यान सादर झालेल्या कागदपत्रांची पडताळणी करून संबंधित मतदारांचे नाव अंतिम मतदार यादीत समाविष्ट करणे अथवा वगळणे याबाबत नियमांनुसार निर्णय घेण्यात येईल. दावे व हरकती निकाली काढल्यानंतर ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.



