Shivdurg : मढेवडगाव येथे १७५५ मधील ऐतिहासिक शिलालेखाचा शोध; ‘वाबळे पाटील’ घराण्याच्या इतिहासावर प्रकाश

वाड्यासोबतच देवीच्या मंदिराचा पाया घातल्याचा उल्लेख

0
Shivdurg : मढेवडगाव येथे १७५५ मधील ऐतिहासिक शिलालेखाचा शोध; 'वाबळे पाटील' घराण्याच्या इतिहासावर प्रकाश
Shivdurg : मढेवडगाव येथे १७५५ मधील ऐतिहासिक शिलालेखाचा शोध; 'वाबळे पाटील' घराण्याच्या इतिहासावर प्रकाश

Shivdurg : नगर : श्रीगोंदा तालुक्यातील मौजे मढेवडगाव येथे ऐतिहासिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि सुमारे २७१ वर्षे जुना शिलालेख (Inscription) शोधण्यात इतिहास संशोधकांना यश आले आहे. येथील प्रसिद्ध ग्रामदैवत भैरवनाथ मंदिराशेजारी, ग्रामपंचायतीलगत असलेल्या ऐतिहासिक सरदार वाबळे गढीच्या (Sardar Wable Gadhi) मुख्य प्रवेशद्वाराच्या कमानीवर हा शिलालेख कोरलेला आहे. या शोधामुळे अठराव्या शतकातील ग्रामीण महाराष्ट्राची सामाजिक, राजकीय आणि स्थापत्य रचना (Architectural Structure) पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे.

नक्की वाचा : घरकुलाच्या अनुदानासाठी २० हजारांची लाच; ग्रामविकास अधिकारी, लिपिक व गृहनिर्माण अभियंत्याविरुद्ध एसीबीची कारवाई

८ ओळींचा देवनागरीतील मजकूर

हा शिलालेख देवनागरी लिपीत आणि मराठी भाषेत असून एकूण ८ ओळींचा आहे. अनेक वर्षे उघड्यावर असल्याने वातावरणाच्या परिणामामुळे यावरील काही अक्षरे पुसट व नष्ट झाली आहेत. इतिहास संशोधकांनी अत्यंत अथक परिश्रम घेऊन, खडूचा छाप पद्धतीचा वापर करत या शिलालेखाचे यशस्वी वाचन केले आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

शिलालेखाचा अर्थ (Shivdurg)

शिलालेखाच्या वाचनानुसार, हा लेख १० जुलै १७५५ (गुरुवार, शालिवाहन शक १६७७, युवा नाम संवत्सर, आषाढ शुद्ध १) या काळातील आहे. “श्री भैरवनाथाच्या कृपेने, त्यांचे परमभक्त येमाजी वलद येसवंतराव पाटील वाबळे (मोकदम) यांचे पुत्र संताजी पाटील, राणोजी पाटील, चापाजी पाटील, जानराव पाटील आणि यशवंतराव पाटील वाबळे (रा. मौजे मढेवडगाव, प्रांत कर्डे) या सर्वांनी मिळून या गढीचा दरवाजा उभारला, देवीच्या मंदिराचा पाया घातला, अष्टकोनी बुरुज वाडा बांधला आणि तटबंदीचे कार्य वेळेत पूर्ण करून घेतले.” असा या शिलालेखाचा अर्थ आहे.

वाड्यासोबतच देवीच्या मंदिराचा पाया घातल्याचा उल्लेख

हा शिलालेख मराठा कालखंडातील ग्रामीण प्रशासनाचा एक उत्तम पुरावा मानला जात आहे. तत्कालीन ‘प्रांत कर्डे’ अंतर्गत येणाऱ्या मढेवडगाव येथील वाबळे पाटील (मोकदम) घराण्याचे गावातील नेतृत्व आणि योगदान स्पष्ट होते. शिलालेखात उल्लेख असलेला ‘अष्टकोनी बुरुज वाडा’, गढीचा दरवाजा आणि तटबंदी यावरून तत्कालीन स्थापत्यकौशल्य आणि गावाच्या सुरक्षेसाठी गढ्या बांधण्याच्या परंपरेची माहिती मिळते. गढी आणि वाड्यासोबतच देवीच्या मंदिराचा पाया घातल्याचा उल्लेख आहे, जो तत्कालीन समाजातील धार्मिक श्रद्धा आणि लोकसहभाग दर्शवतो.

संशोधन व सहकार्य

या ऐतिहासिक शिलालेखाचे मुख्य संशोधन राजेश इंगळे यांनी केले असून, त्याचे क्लिष्ट वाचन पुण्याचे प्रसिद्ध शिलालेख अभ्यासक अनिल दुधाणे यांनी केले आहे. या संपूर्ण शोधमोहिमेत, शिलालेख शोधणे, त्याचा छाप घेणे आणि छायाचित्रे काढण्यासाठी शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन संचलित शिवदुर्ग वारसा संवर्धन समितीचे मारूती वागस्कर, गणेश कुदांडे, नंदिनी वाबळे, नितीन वाबळे, भैय्या वाबळे, शुभम वाबळे, डॉ. अभय शिंदे, आविष्कार इंगळे तसेच स्थानिक वाबळे परिवाराचे मोलाचे सहकार्य लाभले. या ऐतिहासिक शोधामुळे मढेवडगावच्या वैभवात आणि ऐतिहासिक वारशामध्ये मोलाची भर पडली असून, संपूर्ण तालुक्यातून या कामगिरीचे कौतुक होत आहे.