Fraud : शेवगाव : बनावट दिव्यांग प्रमाणपत्राचा वापर करून शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतल्याप्रकरणी संतोष रतन खरड (रा. देवटाकळी, ता. शेवगाव) याच्याविरुद्ध शेवगाव पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सोनाली लक्ष्मण दहीफळे (रा. खडोबानगर, शेवगाव) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, संतोष रतन खरड याने बनावट दिव्यांग (UDID) प्रमाणपत्राचा वापर करून संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतल्याची तक्रार सावली दिव्यांग संघटनेचे बाबासाहेब महापुरे यांनी जिल्हाधिकारी,अहिल्यानगर यांचेकडे केली होती.
नक्की वाचा : साकुरी येथे खरीप पीक विमा २०२६ योजनेचा प्रारंभ; शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने घेतला लाभ
जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत चौकशी
तक्रारीनंतर तत्कालीन तहसीलदार यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत चौकशी करण्यात आली. त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक, अहमदनगर यांच्याकडून संबंधित दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात आली. तपासात संबंधित UDID प्रणालीवरील माहिती आणि सादर केलेल्या प्रमाणपत्रातील लोकोमोटर अपंगत्वाची टक्केवारी यामध्ये तफावत आढळल्याचे नमूद करण्यात आले आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा (Fraud)
या पडताळणीनंतर शासनाच्या निर्देशांनुसार संबंधित प्रकरणात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार शेवगाव तहसीलदार यांनी शेवगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 340(2) व 336(3) अन्वये संतोष रतन खरड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल परशुराम भीमराव नकाडे करीत आहेत.



