
P2P Trekking : नगर : ‘जय भवानी, जय शिवराय’चा गगनभेदी जयघोष, वीर शिवा काशिद आणि नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या स्मृतींना वंदन करत, अंगात रोमांच सळसळणाऱ्या वातावरणात ऐतिहासिक पन्हाळा ते पावनखिंड ५२ किलोमीटरची अमृत महोत्सवी (७५ वी) मोहीम अतिशय उत्साहात पार पडली. “लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे” या अनन्यसाधारण निष्ठेने स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या बांदल सेनेच्या ३०० मावळ्यांच्या असीम पराक्रमाला या मोहिमेदरम्यान मानवंदना देण्यात आली.
नक्की वाचा : शिर्डीत रक्तरंजित थरार! काकडी विक्रेत्या महिलेवर महिलांकडूनच चाकूने वार
कोल्हापूर येथील ‘हिल रायडर्स’ संस्थेच्या वतीने या खडतर आणि ऐतिहासिक पदभ्रमंतीचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे हे ४१ वे वर्ष असून, या अमृत महोत्सवी मोहिमेत राज्यभरातून तब्बल ७५० शिवप्रेमी युवक-युवती सहभागी झाले होते. मोहिमेची सुरुवात ऐतिहासिक पन्हाळगडावरील वीर शिवा काशिद आणि नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या भव्य पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाली. यावेळी हिल रायडर्सचे अध्यक्ष प्रमोद पाटील, रायबा राहुल नलावडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
‘शिवदुर्ग ट्रेकर्स’चा विशेष सन्मान
हिल रायडर्स फाऊंडेशनसोबत ‘शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन’ सलग पाचव्या वर्षी या ऐतिहासिक मोहिमेत ९१ सदस्यांसह सहभागी झाले होते. या योगदानाबद्दल संस्थेचा विशेष सन्मान करण्यात आला. रायगड-पनवेलचे तहसीलदार जितेंद्र इंगळे आणि शिवदुर्गच्या स्वयंसेवक शिलेदारांनी हा सन्मान स्वीकारला. मोहिमेदरम्यान शिवदुर्ग मावळा प्रणव गलांडे यांनी दिलेल्या कडक शिवगर्जनेने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आणि उपस्थितांमध्ये एक नवी ऊर्जा भरली. याप्रसंगी शिवदुर्ग परिवाराच्या वतीने हिल रायडर्सचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच मोहिमेदरम्यान डॉ. संजय वाघमोरे यांनी सर्व सहभागींना तत्पर आणि मोफत वैद्यकीय सेवा पुरवली.
नक्की पहा : पंढरपूरच्या यात्रेसाठी एसटीची जय्यत तयारी; भाविकांसाठी २३० जादा बसचे नियोजन
दांपत्याची सलग ५ वर्षे वारी (P2P Trekking)
लहान वयात ५२ किमीची खडतर वाटचाल यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या आदिती खोमणे आणि राजवीर रोकडे या बालमावळ्यांचा विशेष कौतुक करून सन्मान करण्यात आला. शिवदुर्गचे संस्थापक अध्यक्ष राजेश इंगळे आणि त्यांच्या पत्नी संगीता इंगळे यांनी २०२२ ते २०२६ अशी सलग पाच वर्षे जोडीने ही पावनखिंड वारी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. “महाराष्ट्रात जन्माला येऊन पावनखिंडीची वारी केली नाही, तर काय मिळवले?” या भावनेतून ते दरवर्षी शेकडो शिवप्रेमींना या पावनवाटेवर घेऊन जात आहेत.
दिग्गजांची उपस्थिती आणि उत्तम नियोजन (P2P Trekking)
या ऐतिहासिक मोहिमेचे उत्कृष्ट नियोजन मोहीम प्रमुख अक्षय ओहळ व शिवदुर्ग शिलेदार टीमने केले होते. या मोहिमेत ‘चांडाळ चौकडी फेम’ रामभाऊ जगताप, डॉ. संदीप पाटील, डॉ. संजय वाघमोरे, संगीता इंगळे, प्रा. भरत खोमणे, डॉ. अर्चना वाघमारे, डॉ. वंदना पाटील, अमोल बडे, तुषार चौधरी, प्रणव गलांडे, चेतन चौधरी, सुहास गाडेकर, प्रा. प्रमोद परदेशी, प्रा. विजय इथापे, प्रा. अमर भोसले, शंकर जाधव, औदुंबर शिंदे यांच्यासह ९१ शिलेदार सहभागी झाले होते. पावनखिंडीचा इतिहास प्रत्यक्ष अनुभवताना प्रत्येक शिवप्रेमीच्या मनात वीरश्री आणि नवी ऊर्जा संचारल्याचे या मोहिमेदरम्यान पाहायला मिळाले.


