
Yellow Alert for Heavy Rainfall : नगर : भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department) अहिल्यानगर जिल्ह्यात आज सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता (Yellow Alert for Heavy Rainfall) वर्तवून जिल्ह्यास ‘येलो अलर्ट’ (Yellow Alert) जारी केला आहे. तसेच नदीकाठच्या नागरिकांसह धरणक्षेत्रातील पर्यटकांनी विशेष सतर्कता बाळगून जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गिते यांनी केले आहे.
भीमा गोदावरी नद्यांची पाणीपातळी वाढण्याची शक्यता
जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांमध्ये आज दुपारी मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. भीमा नदीत दौंड पुलाजवळ २७ हजार ६५१ क्युसेक, घोड धरणातून घोड नदीत ४ हजार क्युसेक आणि गोदावरी नदीवरील नांदूर मध्यमेश्वर धरणातून ५५ हजार ७७८ क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. पुणे, नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहिल्यास भीमा, घोड व गोदावरी नद्यांच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील भंडारदरा, निळवंडे व मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू असून धरणांमध्ये पाण्याची आवक वाढत आहे. त्यामुळे प्रवरा व मुळा नदीकाठच्या नागरिकांसह धरणक्षेत्रात येणाऱ्या पर्यटकांनी विशेष खबरदारी घ्यावी.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
अशी घ्या काळजी (Yellow Alert for Heavy Rainfall)
मेघगर्जना व विजांचा कडकडाट सुरू असताना झाडाखाली अथवा झाडांजवळ उभे राहू नये. तसेच मोकळी मैदाने, टॉवर, ध्वजांचे खांब, विद्युतवाहिन्या, ट्रान्सफॉर्मर, धातूचे कुंपण आणि रोहित्रांपासून दूर राहावे. वादळी वाऱ्यादरम्यान कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. ट्रॅक्टर, शेतीची अवजारे, मोटारसायकल, सायकल आदींपासून सुरक्षित अंतर राखावे. मोकळ्या जागेत अडकल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हातांनी कान व डोके झाकावे आणि जमिनीशी कमीत कमी संपर्क ठेवावा. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जाहिरात फलक कोसळण्याची शक्यता असल्याने त्यांच्या आजूबाजूला थांबणे टाळावे.
पर्यटकांनी धरणे, नद्या व ओढ्यांच्या पाण्याच्या प्रवाहात उतरू नये तसेच धोकादायक ठिकाणी छायाचित्रे (सेल्फी) काढणे टाळावे. नदी, ओढे व नाल्यांवरील पूल अथवा बंधारे पाण्याखाली गेले असल्यास ते ओलांडू नयेत. पाणीपातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रापासून सुरक्षित अंतर राखून तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. अतिवृष्टीमुळे भूस्खलन अथवा दरडी कोसळण्याची शक्यता असल्याने डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या नागरिकांनी दक्षता घ्यावी तसेच घाटरस्त्यांवरील प्रवास शक्यतो टाळावा. जुनाट अथवा धोकादायक इमारतींमध्ये आश्रय घेऊ नये. सर्व नागरिकांनी स्वतःचे तसेच जनावरांचे संरक्षण करून स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


