
Superintendent of Police : नगर : अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील (Ahilyanagar District Police Force) बदल्यांच्या प्रक्रियेला अंतिम स्वरूप देत पोलीस अधीक्षक (Superintendent of Police) मुम्मका सुदर्शन यांनी श्रेणी पोलीस उपनिरीक्षक ते पोलीस शिपाई अशा एकूण ८४ पोलीस अंमलदारांच्या विनंती बदल्या केल्या आहेत. याचबरोबर जून २०२६ मध्ये करण्यात आलेल्या प्रशासकीय बदल्यांमध्ये असमाधानी असलेल्या ३७अंमलदारांच्या बदल्यांमध्ये अंशतः सुधारणा करण्यात आली असून काही अंमलदारांना एक वर्षासाठी स्थगिती देण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेला (Local Crime Branch) बळकटी देण्यासाठी १६ अंमलदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भातील आदेश जारी करण्यात आले.
नक्की वाचा : तरुण शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; तिघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
पोलीस दलातील बदल्यांची व्यापक प्रक्रिया
पोलीस अधीक्षक सुदर्शन यांनी जिल्ह्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पोलीस दलातील बदल्यांची व्यापक प्रक्रिया हाती घेतली होती. या प्रक्रियेत स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रभारींसह जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यानंतर कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या तसेच पोलीस अंमलदारांच्या प्रशासकीय बदल्याही करण्यात आल्या होत्या. प्रशासकीय बदल्यांनंतर अनेक अंमलदारांनी आपल्या बदलीमध्ये बदल करण्यासाठी अर्ज सादर केले होते. या अर्जावर पोलीस अधीक्षक सुदर्शन यांनी वैयक्तिक पातळीवर विचार करून पात्र प्रकरणांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. काही अंमलदारांच्या बदल्या रद्द करून त्यांना एक वर्षासाठी स्थगिती देण्यात आली, तर काहींची बदली एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी करण्यात आली. दरम्यान, प्रशासकीय बदलीसाठी पात्र नसलेल्या अनेक अंमलदारांनीही विनंती बदलीसाठी अर्ज केले होते. मात्र शेकडो अर्ज प्राप्त झाल्याने तसेच विविध पोलीस ठाण्यांतील रिक्त पदांचा विचार करून मर्यादित प्रमाणातच विनंती बदल्या मंजूर करण्यात आल्या. उर्वरित अर्जदारांची विनंती अमान्य करून त्यांचे अर्ज दप्तरी दाखल करण्यात आल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
विनंती बदल्यांमध्ये यांचा समावेश (Superintendent of Police)
विनंती बदल्यांमध्ये एक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, पाच सहायक फौजदार, २६ पोलीस हवालदार, पाच पोलीस नाईक आणि ४७ पोलीस शिपाई अशा एकूण ८४ अंमलदारांचा समावेश आहे. याशिवाय जून २०२६ मध्ये झालेल्या प्रशासकीय बदल्यांमध्ये ३७ अंमलदारांच्या बदल्यांमध्ये अंशतः सुधारणा करण्यात आली आहे. यात दोन श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, सात सहायक फौजदार, १४ पोलीस हवालदार, दोन पोलीस नाईक आणि १२ पोलीस शिपायांचा समावेश असून काहींना एक वर्षाची स्थगिती देण्यात आली आहे, तर काहींची नवीन ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे.


