RTO : नगर : प्रादेशिक परिवहन विभागाकडून (RTO) शहरात सर्वसामान्य नागरिक, शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी वाहने तसेच मालवाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांवर (Heavy vehicles) सातत्याने कारवाई केली जाते. मात्र याच विभागाच्या नजरेसमोर अहिल्यानगर महापालिकेची (Ahilyanagar Municipal Corporation) अनेक वाहने विमा आणि पीयूसीशिवाय रस्त्यावर धावत असल्याचा गंभीर आरोप होत असून, आरटीओ प्रशासनाकडून या वाहनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
नक्की वाचा : पहिल्याच दिवशी रंगले चुरशीचे सामने; तीन विजयांसह आठरे पाटील स्कूलची विजयी सलामी
महापालिकेच्या ताब्यात सुमारे ७० ते ८० लहान-मोठी वाहने
महापालिकेच्या ताब्यात सुमारे ७० ते ८० लहान-मोठी वाहने आहेत. महासभेत नगरसेवक निखिल वारे यांनी केलेल्या आरोपानुसार, यापैकी केवळ मोजक्याच वाहनांचा विमा उतरवण्यात आला असून अनेक वाहने विमा आणि पीयूसीविना वापरली जात आहेत. हा विषय वारंवार महासभेत उपस्थित करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. महापालिकेच्या वाहनांचा विमा काढण्याचा ठराव मंजूर होऊनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. आयुक्त यशवंत डांगे यांना अनेक सूचना आणि ठरावांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही सभागृहात करण्यात आला. त्यामुळे एखादा अपघात झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आयुक्तांवर राहील, असा स्पष्ट इशारा नगरसेवकांनी दिला.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
आरटीओच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह (RTO)
सर्वसामान्य नागरिकांच्या वाहनांवर विमा किंवा पीयूसी नसल्यास आरटीओकडून तातडीने दंडात्मक कारवाई केली जाते. मग महापालिकेच्या वाहनांसाठी वेगळे नियम आहेत का?, असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत. कायदा सर्वांसाठी समान असल्याचा दावा करणाऱ्या यंत्रणांनी स्वतःच्या प्रशासनाकडे मात्र डोळेझाक केल्याचा आरोप होत आहे. महापालिकेची वाहने रोज शहराच्या रस्त्यांवर धावत असताना ती आरटीओ अधिकाऱ्यांना दिसत नाहीत का?, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. एका बाजूला सर्वसामान्य वाहनधारकांवर कठोर कारवाई आणि दुसऱ्या बाजूला महापालिकेच्या वाहनांना अभय, अशी परिस्थिती निर्माण झाल्याने आरटीओच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता प्रादेशिक परिवहन विभागाने कोणताही दुजाभाव न करता महापालिकेच्या नियमबाह्य वाहनांची तपासणी करून दोषी वाहनांवरही तत्काळ कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिक आणि नगरसेवकांकडून केली जात आहे.



