Water Crisis : अहिल्यानगर: जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे प्रमुख धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा निर्माण झाला असला, तरी जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाची असमानता (Water Crisis) कायम आहे. विशेषतः दक्षिणेकडील तालुक्यांमध्ये समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील पिकांवर संकट ओढवले असून अनेक गावांतील नागरिकांना अद्याप टँकरच्या पाण्यावरच (Tanker Water Supply) अवलंबून राहावे लागत आहे. सध्या जिल्ह्यातील 115 गावे आणि 624 वाड्या-वस्त्यांमधील तब्बल 2 लाख 31 हजार 953 नागरिकांना 115 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
धरणांच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ (Water Crisis)
जिल्ह्याचा सर्वाधिक पावसाचा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकोले तालुक्यातील घाटमाथ्यावर गेल्या काही आठवड्यांत झालेल्या मुसळधार पावसामुळे भंडारदरा (Bhandardara Dam), निळवंडे, आढळा आणि मुळा धरणांच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. भंडारदरा आणि निळवंडे ही धरणे तांत्रिकदृष्ट्या पूर्ण क्षमतेपर्यंत भरलेली नसली, तरी प्रत्यक्षात ती जवळपास पूर्ण भरल्याची स्थिती आहे. आढळा मध्यम प्रकल्पही पूर्ण क्षमतेने भरला आहे.मात्र दक्षिण भागासाठी महत्त्वाचा असलेला मुळा धरण प्रकल्प अद्याप पूर्ण क्षमतेपासून दूर असून त्यात केवळ 55.30 टक्के जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे नगर, पारनेर, शेवगाव, पाथर्डी, जामखेड, कर्जत यांसारख्या भागांतील पाणीस्थितीबाबतची चिंता कायम आहे.
हे वाचा: महापालिकेच्या वाहनांना आरटीओचे अभय? विमा, पीयूसीविना धावणाऱ्या वाहनांवर कारवाई कधी?
दक्षिणेकडील अनेक तालुके पावसाच्या प्रतीक्षेत (Water Crisis)
जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या 107 टक्के पावसाची नोंद झाली असली, तरी हा पाऊस संपूर्ण जिल्ह्यात समान स्वरूपात झालेला नाही. उत्तरेकडील डोंगराळ आणि घाटमाथ्याच्या भागात मुसळधार पाऊस झाला, तर दक्षिणेकडील अनेक तालुके अद्याप समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे खरीप पिकांना आवश्यक ओलावा मिळालेला नाही. अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीची भीती सतावत असून पिकांच्या वाढीवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
पावसाळ्यातही टँकरने पाणीपुरवठा सुरु (Water Crisis)
काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात टँकरची संख्या तब्बल 165 पर्यंत पोहोचली होती. गेल्या 15 दिवसांत काही भागांत पाऊस झाल्याने त्यात सुमारे 50 टँकरांची घट झाली असली, तरी परिस्थिती अद्याप पूर्णपणे सुधारलेली नाही. सध्या 115 गावे आणि 624 वाड्या-वस्त्यांसाठी 115 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. दक्षिण भागातील विसापूर मध्यम प्रकल्पात 92.24 टक्के जलसाठा उपलब्ध असला, तरी हा साठा स्थानिक पावसामुळे नव्हे, तर कुकडी प्रकल्पाच्या कालव्यातून सोडलेल्या पाण्यामुळे निर्माण झाला आहे. त्यामुळे नैसर्गिक पावसाअभावी या भागातील जलस्रोतांवरील ताण कायम असल्याचे स्पष्ट होत आहे.
नक्की वाचा: पहिल्याच दिवशी रंगले चुरशीचे सामने; तीन विजयांसह आठरे पाटील स्कूलची विजयी सलामी
धरणे भरली तरी दक्षिण भागात पाणी टंचाई (Water Crisis)
दरम्यान, जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam) 57.70 टक्के जलसाठा उपलब्ध असून उजनी धरण (Ujani Dam) पूर्ण क्षमतेने भरले आहे. मात्र या धरणांतील साठ्याचा जिल्ह्यातील सर्वच भागांना थेट लाभ होत नसल्याने स्थानिक पातळीवरील पाणीटंचाईचे संकट कायम आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी याच कालावधीत जिल्ह्यात केवळ 22 टँकर सुरू होते. यंदा ही संख्या 115 वर असल्याने पावसातील असमानता आणि दक्षिण भागातील गंभीर पाणीटंचाई अधोरेखित होत आहे. एकीकडे धरणे भरल्याचे समाधान असले, तरी दुसरीकडे 2 लाख 31 हजार 953 नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत असल्याचे चित्र प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरत आहे.



