
State-level Honour : नगर : कारगिल विजय दिनाच्या २७ व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबई येथील लोककल्याण भवनात आयोजित राज्यस्तरीय गौरव सोहळा देशभक्ती, शौर्य आणि कृतज्ञतेने भारलेला ठरला. महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री आशिष शेलार, शंभूराज देसाई, महासंचालक पोलीस सदानंद दाते, तिन्ही दलांचे वरिष्ठ अधिकारी, सैनिक कल्याण विभागाचे संचालक दीपक ठोंगे तसेच कारगिल वीर, वीरपत्नी आणि सैनिक परिवार यांच्या उपस्थितीत हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.
नक्की वाचा : पहिल्याच दिवशी रंगले चुरशीचे सामने; तीन विजयांसह आठरे पाटील स्कूलची विजयी सलामी
यांचा विशेष सन्मान
या गौरव सोहळ्यात अहिल्यानगर जिल्ह्याचा अभिमान असलेले कारगिल हिरो एकनाथ पवार, तसेच शहीद जवक अंकुश दादाभाऊ यांच्या वीरपत्नी कल्पना जवक आणि शहीद भानुदास गायकवाड यांच्या वीरपत्नी मीनाबाई गायकवाड यांचा महामहिम राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन विशेष सन्मान करण्यात आला. राज्यस्तरावर झालेला हा गौरव अहिल्यानगर जिल्ह्यासाठी अभिमानाची आणि गौरवाची बाब ठरली.
नक्की पहा : सोया चाप बॅटर अंगाला लावत कामगाराने बनवला रील
बलिदानाला मानवंदना (State-level Honour)
यापूर्वी अहिल्यानगर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी स्कॉड्रन लीडर विद्यासागर कोरडे यांनीही या वीरांचा सन्मान करून जिल्ह्याच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली होती. आता राज्य शासनानेही त्याच शौर्याला सलाम करत या वीरांना सन्मानित केल्याने त्यांच्या बलिदानाला संपूर्ण महाराष्ट्राने मानवंदना दिली. अहिल्यानगरच्या वीरांचा राज्यस्तरीय गौरव हा केवळ एका जिल्ह्याचा सन्मान नसून संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण आहे.


