Gulabrao Patil : शेतकऱ्यांना त्रास झाला तरी चालेल,पण उद्योजकांना नको; गुलाबराव पाटलांच्या विधानानं नवा वाद

0
Gulabrao Patil : शेतकऱ्यांना त्रास झाला तरी चालेल,पण उद्योजकांना नको; गुलाबराव पाटलांच्या विधानानं नवा वाद
Gulabrao Patil : शेतकऱ्यांना त्रास झाला तरी चालेल,पण उद्योजकांना नको; गुलाबराव पाटलांच्या विधानानं नवा वाद

नगर : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) हे नेहमीच आपल्या विधानांनी चर्चेत असतात. ते कधी शेरोशायरीतून विरोधकांना जोरदार उत्तर देतात, कधी आपल्या तडाखेबंद भाषणातून समोरच्याला नामोहरण करतात तर कधी आपल्याच विधानाने स्वत:ची कोंडी करून घेतात. आताही गुलाबराव पाटील यांनी स्वत:ची कोंडी करून घेतली आहे. त्यांनी उद्योजकांची बाजू घेणारं आणि शेतकऱ्यांना कमी लेखणारं विधान (A statement that belittles farmers) केलं आहे. ‘शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर आम्ही सहन करून घेऊ पण उद्योजकांना त्रास होऊ देऊ नका’ असं विधान गुलाबराव पाटील यांनी केल्याने ते पुन्हा चर्चेत आले आहेत.

नक्की वाचा : विद्यार्थ्यांच्या आंदोलनापुढे केंद्र सरकार झुकलं,धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया

गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणालेत? (Gulabrao Patil)

गुलाबराव पाटील हे चिंचोली येथे एका पॉवर ट्रान्सफॉर्मरच्या लोकार्पण कार्यक्रमाला आले होते, त्यावेळी त्यांनी हे विधान केले आहे.गुलाबराव पाटील यावेळी बोलताना म्हणाले की,
सर्वसाधारण माणसांना या गोष्टीचा जो त्रास होत आहे; तो कसा कमी करता येईल याचा विचार करण्याची अत्यावश्यक गरज आहे. आमची एवढीच विनंती आहे की, एकवेळेस आम्ही शेतकरी सहन करुन घेऊ. पण उद्योजकाला फार त्रास होतो. कारण उद्योजकाला मजुराला पैसै द्यायचे असतात.

वीज गेली तर असे म्हणता येत नाही की तुला मी पैसे देणार नाही. यामुळे त्याचे नुकसान होते. त्याच्या उत्पादनावर परिणाम होतो. दुसरा नवीन येणारा उद्योजक म्हणेल की जाऊ दे, इथे वीज मिळत नाही तर उद्योग कशाला टाकायचा? म्हणून आमची हात जोडून विनंती आहे की शेतकऱ्याला थोडा त्रास झाला तर आम्ही सहन करू. पण आमच्या उद्योजकांना त्रास होऊ देऊ नका, एवढीच आमची हात जोडून विनंती आहे. स्मार्ट मीटरवरून बोलताना त्यांनी हे विधान केले आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या या वक्तव्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.

अवश्य वाचा : पाच फुटाचा बच्चन” मधून दुमदुमणार राम कृष्ण हरीचा गजर, चित्रपटातून उलगडणार तरूण कीर्तनकार मुलीची गोष्ट

उद्योजकांची बाजू घेण्याच्या पालकमंत्र्यांच्या विधानावरून शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत असली तरी त्यात वारंवार व्यत्यय येतो. दिवसभरातून चार ते पाच वेळा वीज जाते. यामुळे शेतांमध्ये पाणी भरणे अशक्य होते. शेतकरी आणि उद्योजक दोघेही आपापल्या क्षेत्रात गुंतवणूक करतात. शेतकरी कच्चा माल पिकवतो. त्यावर उद्योजक प्रक्रिया करतो. त्यामुळे उद्योजकांच्या बरोबरीने शेतकरी महत्त्वाचा आहे असं जिल्हा शेतकरी संघर्ष समितीचे निमंत्रक किशोर चौधरी यांनी म्हटलं आहे.

गुलाबराव पाटलांना एक आठवडाभर उपाशी ठेवले पाहिजे(Gulabrao Patil)

तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटलांना एक आठवडाभर उपाशी ठेवले पाहिजे. मग अन्न धान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचे महत्त्व त्यांना कळेल. निवडणुकीत शेतकऱ्यांच्या नावाने मते मागायची आणि सत्तेत आल्यानंतर उद्योगपतींच्या मांडीवर जाऊन बसायचे. या वक्तव्यातून महायुती सरकारचा खरा चेहरा लोकांसमोर आला आहे. हीच सरकारची शेतकरी आणि शेतीविषयी भूमिका आहे असा घणाघात शरद पवारांच्या राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी केला आहे.