
Tukaram Mundhe : राज्यात स्वच्छता आणि नियमांच्या तपासणीसाठी अन्न व औषध प्रशासनाकडून (FDA) सुरू असलेल्या धडक कारवाईदरम्यान आता आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांनाच अडचणीचा सामना करावा लागत आहे. छत्रपती संभाजीनगर येथील FDA प्रयोगशाळेतील (FDA Laboratory at Chhatrapati Sambhajinagar) तब्बल 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मुंढे यांच्या कार्यपद्धतीविरोधात थेट अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. 15 जुलै रोजी दिलेल्या या निवेदनामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
नक्की वाचा : अहिल्यानगरात अवैध धंद्यांवर एलसीबीचा धडक कारवाईचा बडगा; २१ गुन्हे दाखल
कर्मचाऱ्यांचे प्रमुख आक्षेप काय आहेत?
अचानक दोन शिफ्ट: कोणतीही पूर्वतयारी न करता प्रयोगशाळेत दोन शिफ्टमध्ये काम सुरू करण्यात आले. मात्र त्यासाठी लागणारे पुरेसे मनुष्यबळ, तंत्रज्ञान आणि संसाधने उपलब्ध करून दिली गेली नाहीत. त्यामुळे सध्याच्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे.
वाढले कामाचे तास: कर्मचाऱ्यांना सकाळी 9 ते रात्री उशीरापर्यंत काम करावे लागत आहे. शिवाय शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीही हजर राहण्याचे आदेश दिल्याने नाराजीचा सूर आहे.
गुणवत्तेचा प्रश्न: प्रलंबित अन्न, औषध आणि सौंदर्यप्रसाधनांचे नमुने लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी घाई केली जात आहे. त्यामुळे विश्लेषणाच्या गुणवत्तेशी तडजोड होण्याची भीती कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. एका विश्लेषकाकडून ठराविक मर्यादेपेक्षा जास्त नमुने तपासून घेतल्याने अचूकतेवर परिणाम होऊ शकतो, असा दावा आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
कर्मचाऱ्यांच्या 4 प्रमुख मागण्या (Tukaram Mundhe)
*शासन निर्णयानुसार पूर्वीची कार्यालयीन वेळ पुन्हा लागू करावी.
*दोन शिफ्टची पद्धत तात्काळ रद्द करावी.
*इतर शासकीय कार्यालयांप्रमाणे शनिवार-रविवारची सुट्टी द्यावी.
*रिक्त पदे भरून पुरेसे मनुष्यबळ द्यावे आणि अतिरिक्त कामाचा मोबदला द्यावा.
राज्यात रेस्टॉरंट, डेअरी आणि उपहारगृहांवर कडक कारवाई करून चर्चेत असले तुकाराम मुंढे आता स्वतःच्या विभागातील कर्मचाऱ्यांच्या नाराजीमुळे चर्चेत आले आहेत. या तक्रारीनंतर मंत्री झिरवळ काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


