Snehalaya : पारनेरमध्ये स्नेहालय उडान प्रकल्पांतर्गत ‘माझी शाळा, बालविवाह मुक्त शाळा’ अभियान

मुलींच्या सुरक्षिततेबाबत संवेदनशील मार्गदर्शन

0
Snehalaya : पारनेरमध्ये स्नेहालय उडान प्रकल्पांतर्गत ‘माझी शाळा, बालविवाह मुक्त शाळा’ अभियान
Snehalaya : पारनेरमध्ये स्नेहालय उडान प्रकल्पांतर्गत ‘माझी शाळा, बालविवाह मुक्त शाळा’ अभियान

Snehalaya : पारनेर : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक (Lokmanya Tilak) यांच्या पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे (Annabhau Sathe) यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करून न्यू इंग्लिश स्कूल, पारनेर येथे स्नेहालय (Snehalaya) उडान प्रकल्पांतर्गत ‘माझी शाळा, बालविवाहमुक्त शाळा’ अभियानाचा जनजागृती कार्यक्रम उत्साहात झाला. विद्यार्थ्यांमध्ये बालविवाह, बाल लैंगिक शोषण, बालहक्क आणि मुलींच्या सुरक्षिततेबाबत जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पारनेर पोलीस निरीक्षक संतोष खेडकर होते. 

नक्की वाचा : श्रीगोंदा बस स्थानकाच्या दुरवस्थेवरून खासदार लंके आक्रमक; अधिकाऱ्यांना सात दिवसांचा ‘अल्टिमेटम

मुलींच्या सुरक्षिततेबाबत संवेदनशील मार्गदर्शन

प्रास्ताविकात ज्ञानेश्वर कवडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यानंतर उडान प्रकल्पाचे व्यवस्थापक प्रवीण कदम यांनी विद्यार्थ्यांना बालविवाह कायदा, त्याचे दुष्परिणाम, बाल लैंगिक शोषणापासून संरक्षण देणारा कायदा, बालकांचे हक्क व अधिकार आणि मुलींच्या सुरक्षिततेबाबत संवेदनशील मार्गदर्शन केले.“न कळत केलेली एखादी चूक आयुष्यभरासाठी संकट निर्माण करू शकते,” हे विविध उदाहरणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समजावून सांगताना कदम यांनी प्रेमाचे आकर्षण, सोशल मीडिया, अनोळखी व्यक्तींशी वाढणारी मैत्री आणि त्यांच्या आमिषांना बळी पडण्याचे धोके याबाबत सावध केले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

काळजी घेण्याचे आवाहन (Snehalaya)

मुलींनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करताना अनोळखी व्यक्तीच्या बोलण्यावर किंवा आमिषावर विश्वास ठेवू नये, कोणतीही व्यक्ती काही खाण्यापिण्याचे पदार्थ देत असेल तर ते घेऊ नये, अनोळखी व्यक्तीसोबत कुठेही जाऊ नये, वैयक्तिक माहिती किंवा फोटो शेअर करू नयेत तसेच काही संशयास्पद किंवा चुकीचे घडत असल्यास तत्काळ पालक, शिक्षक किंवा विश्वासातील व्यक्तीला सांगावे, असे मार्गदर्शन त्यांनी केले. बालविवाहाच्या संदर्भात बोलताना कदम यांनी सांगितले की, मुलीचे विवाहाचे किमान वय १८ वर्षे आणि मुलाचे २१ वर्षे आहे. बालविवाहामुळे मुलीचे शिक्षण, आरोग्य, मानसिक स्वास्थ्य, सुरक्षितता आणि भविष्यातील संधी धोक्यात येतात. बालविवाह हा केवळ सामाजिक प्रश्न नसून कायद्याने गंभीर गुन्हा आहे.

७३ शाळांमध्ये जनजागृती

उडान प्रकल्प २०२७ अखेरपर्यंत अहिल्यानगर जिल्हा बालविवाहमुक्त करण्याचे ध्येय घेऊन जनजागृती, बालविवाह प्रतिबंध, शिक्षण, पुनर्वसन, आरोग्य आणि स्वावलंबन या सहा सूत्रांवर कार्यरत असल्याचे कदम यांनी सांगितले.‘माझी शाळा, बालविवाहमुक्त शाळा’ अभियानांतर्गत मागील जूनपासून ७३ शाळांमध्ये जनजागृती करण्यात आली असून, आतापर्यंत ३७ हजार ५८० विद्यार्थ्यांपर्यंत बालविवाहविरोधी आणि बालसुरक्षेचा संदेश पोहोचविण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांनी बालविवाहाच्या कायदेशीर परिणामांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

दोन वर्षांपर्यंत कारावास आणि एक लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद

“बालविवाह हा केवळ कायदेशीर गुन्हा नसून बालकांच्या मूलभूत हक्कांवर आणि भविष्यावर घातलेला मोठा घाव आहे. अशा विवाहामुळे मुलींच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतात,” असे त्यांनी सांगितले.“बालविवाह घडवून आणण्यासाठी किंवा त्याला मदत करण्यासाठी आई-वडील, नातेवाईक, लग्न लावणारे धर्मगुरू, मंडपवाले, बँड पथक, डीजे, ब्युटी पार्लर चालक, मेहंदी कलाकार, आचारी यांच्यासह प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या संबंधित व्यक्तींवरही कायदेशीर कारवाई होऊ शकते. अशा प्रकरणांमध्ये कोणतीही कुचराई केली जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा खेडकर यांनी दिला. बालविवाह प्रतिबंधक कायद्यांतर्गत दोषींना दोन वर्षांपर्यंत कारावास आणि एक लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

बालविवाहमुक्त समाजनिर्मितीसाठी पुढाकार घ्यावा

यावेळी उडान प्रकल्पाचे व्यवस्थापक प्रवीण कदम, युवा निर्माण प्रकल्पाचे विकास सुतार, शाळेचे प्राचार्य के. बी. शिंदे, पर्यवेक्षक अजित दिवटे, ज्युनियर कॉलेज समन्वयक सतीश फापाळे, जुलेखा शेख, मनिषा जगदाळे, बापुराव होळकर,युवा नेते नियाज राजे, सामाजिक कार्यकर्ते शशिकांत शिंदे, नेहा धिवरे, पत्रकार भगवान गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना शिक्षित, सुरक्षित आणि आत्मनिर्भर बनवणे हीच खरी सामाजिक संपत्ती असून, प्रत्येकाने बालविवाहमुक्त समाजनिर्मितीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.परिसरात बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी उडान हेल्पलाईन ९०११०२६४९५ किंवा पोलीस हेल्पलाईन ११२ वर तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमास न्यू इंग्लिश स्कूलमधील शेकडो विद्यार्थी, शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज्ञानेश्वर कवडे यांनी सूत्रसंचालन केले, तर मुख्याध्यापक के. बी. शिंदे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.